कराची 22 फेब्रुवारी : पाकिस्तानात (Pakistan) काही लोकांनी एका कॉमेडी शोमुळे टीव्ही चॅनेलच्या ऑफिसमध्ये जात तोडफोड केली आहे. या शोमुळे भावना दुखावलेल्या लोकांचा गट जियो न्यूज आणि जंग न्यूज चॅनेलच्या (Geo and Jang media channel) ऑफिसमध्ये घुसले. या लोकांनी त्याठिकाणी तोडफोड केली आणि स्टाफला मारहाणही केली.
स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये जागोजागी अस्थाव्यस्थ सामान आणि तुटलेल्या काचा दिसत आहेत. या टीव्ही शोवर असा आरोप केला जात आहे, की या माध्यमातून सिंध प्रांत आणि सिंधी भाषिक लोकांची थट्टा केली जात आहे. टीव्ही चॅनलच्या खबरनाक शोचे होस्ट इरशाद भट्टी यांनी सांगितलं, की कोणाचाही अपमान करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. एक पत्रकार जेबुनिसा बुरकी म्हणाले, की हे सर्व पोलिसांच्या समोर घडलं. जेव्हा पोलिसांनी माहिती दिली गेली, तेव्हाही हल्ला करणारे तिथेच होते.
लोकांनी विचारलं सरकार कुठे आहे -
जिओ न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक अझर अब्बास यांनी ट्वीटद्वारे या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. जिओ आणि जंग यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले, की त्यांनी रिसेप्शनच्या भागात तोडफोड केली आणि आमच्या कॅमेरामनला मारहाणही केली. सरकार कोठे आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
Everyone has right to peaceful protest. We will protect and support that right. But doing violence and taking the law into their own hands, regardless of the cause, can’t be tolerated. Dialogue is answer to all issues - not violence. pic.twitter.com/qsWYR6m81E
— Azhar Abbas (@AzharAbbas3) February 21, 2021
पोलीस फक्त पाहात राहिले -
जिओ न्यूज कराचीचे पत्रकार फहीम सिद्दीकी म्हणाले, की भट्टी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर माफीही मागितली होती. अशात ही घटना घडायला नको होती. या विरोध प्रदर्शनाबद्दल आधीपासूनच माहिती असतानाही पोलिसांनी काहीच केलं नाही. सर्वकाही माहिती असतानाही न्यूज चॅनेलला सुरक्षा पुरवली नाही. आम्ही या घटनेत सहभागी लोकांवर कारवाई करण्याची मागणी करत आहोत, असंही सिद्दीकी म्हणाले.
सरकारनं काय म्हटलं -
सिंधचे सूचना मंत्री नासिर हुसैन शाह यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत म्हटलं, की आम्ही याप्रकरणाची चौकशी करू. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अलीदेखील म्हणाले, की त्यांनी या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच जिओ न्यूजच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत याबाबत बोलणंही झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष या घटनेनंतर इमरान सरकारवर सवाल उपस्थित करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.