Home /News /videsh /

अझरबैजानविरुद्ध युद्धभूमीवर उतरायला तयार झाली पंतप्रधानांची पत्नी; अर्मेनियन सैन्याबरोबर सराव सुरू

अझरबैजानविरुद्ध युद्धभूमीवर उतरायला तयार झाली पंतप्रधानांची पत्नी; अर्मेनियन सैन्याबरोबर सराव सुरू

Armenia-Azerbaijan Clash : 42 वर्षीय अॅना या पंतप्रधानांच्या पत्नी असल्या तरीदेखील सैनिकांच्या छावणीतच राहात आहेत.

    येरेवान (अर्मेनिया), 30 ऑक्टोबर : पूर्व युरोपीय देश असलेल्या अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमधलं युद्ध थांबण्याची चिन्ह नाहीत. आता अर्मेनियाच्या पंतप्रधानांची पत्नी स्वतःच युद्धभूमीवर उतरायच्या तयारीत आहे. पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या या दोन देशांमध्ये  नागोर्नो-काराबाख प्रांतावरून वाद सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध बंद करण्याचा प्रयत्न करून पाहिला पण तो यशस्वी झाला नाही. अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात मागील 27 सप्टेंबरपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांची पत्नी अॅना हकोबयान यांनी उडी घेतली आहे. अर्मेनियामधील  नागोर्नो-काराबाख  हा भाग वाचवण्यासाठी अॅना आपलं सर्वस्व पणाला लावत आहेत. यासाठी त्यांनी तयारी सुरू केली असून लष्करी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी 27 ऑक्टोबरपासून सैन्याच्या सरावात भाग घेण्यास सुरुवात केली असून महिला सैनिकांबरोबर त्यांनी हा युद्ध अभ्यास सुरू केला आहे. अना यांच्याबरोबर एकूण 13 महिला सैनिक काराबाख परिसराची सुरक्षा आणि रक्षण करण्यासाठी सैन्यामध्ये तैनात आहेत. अना हकोबयान यांना कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नाही. त्या लोकप्रिय पत्रकार असून एका वृत्तपत्राच्या संपादक देखील आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून रायफल आणि इतर हत्यारे चालवण्याची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. या दोन देशांमध्ये नागोर्नो-काराबाख प्रदेशावरून झालेल्या युद्धात जवळपास 5 हजार नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. युद्धात थेट देशाच्या प्रथम महिला उतरल्याने अर्मेनियाच्या लष्कराचं मनोबल उंचावलं आहे. 42 वर्षीय अना या पंतप्रधानांच्या पत्नी असल्या तरीदेखील सैनिकांच्या छावणीतच राहात आहेत. सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात माहिती दिली असून आपण कोणत्याही प्रकारे शत्रूसमोर झुकणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. अना आणि त्यांच्या महिला तुकडीला सात दिवसांचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे  पंतप्रधान निकोल यांनी युद्धामध्ये देशाची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगत सर्वसामान्य नागरिकांना देखील युद्धामध्ये सहभागी होण्याची तयारी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांचा 20 वर्षांचा मुलगा अशोट याने देखील युद्धामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत अर्मेनियाच्या 2 हजार जणांना प्राणाला मुकावं लागलं आहे. 27 सप्टेंबरला सुरू झालं होतं युद्ध अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात 27 सप्टेंबरला युद्धाला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये भयंकर युद्ध झाले होते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेद्वारे हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्या मध्यस्थीनंतर देखील दोन्ही देशांमध्ये वातावरण शांत होण्याची चिन्हे नाहीत. तर दुसरीकडे रशियादेखील आपल्या भागात युद्ध नको म्हणून प्रयत्न करत आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई  लवरोव यांनी या संकटाचे राजकीय समाधान असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर सर्व देशांनी मिळून यावर समाधान काढणे गरजेचे असल्याचे मतदेखील त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच जे देश हे युद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनादेखील रशियाने इशारा दिला आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: War

    पुढील बातम्या