Home /News /videsh /

‘मास्क’ विरोधी चळवळ सुरू करणाऱ्या कॅलेब वॉलेस कोरोनामुळेच मृत्यू

‘मास्क’ विरोधी चळवळ सुरू करणाऱ्या कॅलेब वॉलेस कोरोनामुळेच मृत्यू

कॅलेब वॉलेसने सेंट्रल टेक्सासमधील (Central Texas) अशा विचाराच्या लोकांच्या गटाचे नेतृत्व करत सरकारच्या मास्क सक्तीला विरोध केला होता.

अमेरिका, 02 सप्टेंबर: गेल्या दीड-दोन वर्षांपासून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. कोट्यवधी लोकांना याचा संसर्ग झाला आहे. यावर प्रतिबंधात्मक लस आली असली तरी या विषाणूचे अनेक नवनवीन प्रकार येत असल्याने धोका कायम आहे. सुरुवातीच्या काळाच्या तुलनेत परिस्थिती खूपच सुधारली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानं जगभरातील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. मात्र आजही या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे (Mask), स्वच्छता पाळणे आणि एकमेकांपासून दोन फूट लांब अंतरावर राहणे, गर्दी टाळणे हे उपाय पाळणे अत्यावश्यक आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड होताच शास्त्रज्ञांनी संसर्ग रोखण्यासाठी पहिला उपाय सुचवला होता तो म्हणजे मास्क वापरणे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एका दिवशी लाखो रुग्ण सापडण्याच्या घटना घडत होत्या. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे जगभरात लॉकडाऊन (Lockdown) म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा उपाय अवलंबला गेला. यामुळे जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली,पण दुसरा पर्याय नव्हता. लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले जात होते. मात्र काही लोक या उपाययोजनांना विरोध करत होते. स्वातंत्र्याची (Freedom) गळचेपी होण्याच्या नावाखाली मास्क घालण्यास विरोध केला जात होता. यात अमेरिकेतील (USA) टेक्सासमधील (Texas) कॅलेब वॉलेस (Caleb Wallace ) ही व्यक्ती आघाडीवर होती; मात्र वालेसला कोरोनामुळेच आपला जीव गमवावा लागला आहे. लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिले आहे.

'Corona काळात आरोग्याला घातक ठरताहेत Food Pockets', डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा!

कॅलेबने कोरोना विषाणूचा संसर्ग अत्युच्च शिखरावर असताना मास्क घालण्यास विरोध दर्शवत एक चळवळच (Movement) उभी केली होती. मास्क घालण्याची सक्ती करणे हे लोकांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे, असा या चळवळीतील लोकांचा युक्तिवाद होता. वॉलेसने सेंट्रल टेक्सासमधील (Central Texas) अशा विचाराच्या लोकांच्या गटाचे नेतृत्व करत सरकारच्या मास्क सक्तीला विरोध केला होता. 4 जुलै 2020 रोजी कॅलेब वॉलेसने सॅन एंजेलोमध्ये ‘द फ्रीडम रॅली’ (The Freedom Rally) आयोजित केली होती. त्यावेळी त्याने लोकांनी मास्क घालू नयेत आणि हा व्यवसाय बंद पाडावा असा सल्ला दिला होता. या चळवळीने मोठे रूप धारण केलं होतं. अमेरिकेतील परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत वॉलेसने कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल (Protocol) रद्द करण्याची मागणी केली होती. याच वालेसला कोरोनाला सामोरे जावे लागले आणि आपल्या जीवाला मुकावे लागले. अवघ्या 30व्या वर्षी आपल्या चुकीच्या हट्टापायी त्याला जीव गमवावा लागला आहे. वॉलेसला तीन मुले असून त्याची पत्नी जेसिका चौथ्यांदा गरोदर आहे. जेसिका आणि वालेस आपल्या चौथ्या बाळाच्या प्रतीक्षेत असताना त्याचा मृत्यू झाल्यानं या मुलांचे पित्याचे छत्र हरपले आहे.

केरळमध्ये कोरोनाचं थैमान सुरूच; आता लागणार कडक लॉकडॉऊन!

 कॅलेबची पत्नी जेसिका वालेस हिने दिलेल्या माहितीनुसार, कॅलेबला 26 जुलैपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे जाणवू लागली, परंतु त्यानं त्याची चाचणी करण्यास किंवा रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यानं व्हिटॅमिन सी, झिंक, एस्पिरिन आणि आयव्हरमेक्टिन अशी औषधे घेतली मात्र त्यानं फारसा फरक पडला नाही. अखेर 30 जुलै रोजी त्याला हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.
हॉस्पिटलमध्येही त्याची प्रकृती गंभीर होऊ लागली. 8 ऑगस्ट रोजी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले; पण त्याच शनिवारी त्याचा मृत्यू झाला. स्वातंत्र्याच्या नावाखाली मास्कला विरोध करणाऱ्या कॅलेबला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. इतरांनी तरी यावरून धडा घेणे महत्त्वाचे आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Coronavirus, Face Mask

पुढील बातम्या