बुखारेस्ट, 5 फेब्रुवारी : माजी किकबॉक्सर एंड्र्यु टेटला दुसऱ्यांदा ३० दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्याला संघटीत गुन्हा आणि मानवी तस्करीच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. सहा महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप टेटसह चौघांवर आहे. सहा महिलांना कामावर ठेवून त्यांना अश्लील व्हिडीओ करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आता त्याने ट्विटरवरून एक ट्विटही केलं असून पुरुषांना खोट्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी चॅरीटी उभारणार असल्याचं म्हटलंय.
मी तुरुंगातून माझं इच्छापत्र अपडेट केलंय. पुरुषांना खोट्या आरोपांपासून वाचवायला मी एक चॅरीटी सुरू करण्यासाठी 100 मिलियन देणगी देईन असं अँड्रयू टेटने ट्विटरवर म्हटलं आहे. तर रोमानियात गुन्हे विरोधी संस्था DIICOTच्या प्रवक्त्या रमोना बोला यांनी म्हटलं की, टेटने त्याची कोठडी पुन्हा ३० दिवसांनी वाढवण्याच्या न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्याचे अपील फेटाळून लावले.
बिग ब्रदर शोमध्ये दिसला
महिलांविरोधात अँड्र्यू टेट सतत वक्तव्य करत असे. सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स असलेला टेट २०१६ मध्ये ब्रिटनमधील रिअॅलिटी शो बिग ब्रदरमध्ये दिसला होता. दरम्यान, त्याचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात तो महिलेला बेल्टने मारत होता. त्यानंतर टेटला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं.
हेही वाचा : दारुचं व्यसन, लग्नाआधी गर्लफ्रेंड प्रेग्नंट, पहिलं लग्न मोडलं; वादामुळे विनोद कांबळीचं क्रिकेट करिअर संपलं
पिझ्झाच्या बॉक्सवरून पोलिसांनी शोधला होता पत्ता
एंड्र्यू टेट सोशल मीडियावर सक्रीय आहे.टेटचे ट्विटरवर जवळपास ५ मिलियन फॉलोअर्स आहेत. पण त्याचा शोध घेणं पोलिसांना कठीण होतं. मात्र ग्रेटा थनबर्गसोबत झालेल्या वादानंतर त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात असलेल्या पिझ्झाच्या बॉक्सवरून डिलिव्हरी अॅड्रेस शोधून काढत पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले होते.
याआधीही फेटाळले अपील
बुखारेस्ट कोर्ट ऑफ अपीलमध्ये तो भाऊ ट्रिस्टनसोबत पोहोचला. त्याच्या भावालासुद्धा अटक झाली आहे. दोन रोमानियन महिलांसह चौघांवर मानवी तस्करीचे आरोप आहेत. न्यायालयाने चौघांचेही अपील फेटाळले असून २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना कोठडीत ठेवले जाईल. या प्रकरणाची चौकशी तोपर्यंत पूर्ण होईल. याआधीही त्यांना ३० दिवसांसाठी कोठडी सुनावली होती तेव्हाही केलेलं अपील न्यायालयाने फेटाळलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime