वॉशिंग्टन, 30 डिसेंबर : अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamla Harris) यांनी मंगळवारी कोविड-19 वरील लसीचा पहिला डोस (Corona Vaccine) टोचून घेतला. याचं टीव्हीवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. लस टोचून घेण्यासाठी अमेरिकी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी अमेरिकेतील प्रतिष्ठित व्यक्ती लस टोचून घेत आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी गेल्या आठवड्यात अशीच लस टोचून घेतली होती. लसीबद्दल वेगवेगळे भ्रम पसरवले जात असून अमेरिकेतील काही लोक ती टोचून घेऊ नये, असा प्रचारही करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोघांनी लस टोचून घेतली आहे.
कृष्णवर्णीयांची मोठी वस्ती असलेल्या साउथईस्ट वॉशिंग्टनमधील मेडिकल सेंटरमध्ये हातात हँडग्लोव्हज घातलेल्या तोंडाला शिल्ड लावलेल्या नर्सने हॅरिस यांच्या डाव्या हाताच्या दंडावर इंजेक्शनने लस टोचली. त्यानंतर हॅरिस म्हणाल्या, 'मला काहीच त्रास झाला नाही. ही लस सुरक्षित आहे. प्राणाचं रक्षण करते आणि ती घेताना फारसं दुखतही नाही, त्यामुळे प्रत्येकानी ही लस घ्यावी असं मी आवाहन करते. माझा शास्रज्ञांवर विश्वास आहे.'
हॅरिस यांना मॉडर्ना आयएनसी कोविड-19 लस देण्यात आली आहे. कृष्णवर्णीय आशियाई अमेरिकी समाजातील सर्जन जनरल जेरोम अडम्स यांनी पहिल्यांदा 18 डिसेंबरला ही लस घेतली आहे.
Today I got the COVID-19 vaccine. I am incredibly grateful to our frontline health care workers, scientists, and researchers who made this moment possible.
When you’re able to take the vaccine, get it. This is about saving lives. pic.twitter.com/T5G14LtFJs
— Kamala Harris (@KamalaHarris) December 29, 2020
I urge everyone, when it is your turn, get vaccinated. It's about saving your life, the life of your family members, and your community. pic.twitter.com/VwZdWt2RZG
— Kamala Harris (@KamalaHarris) December 29, 2020
कोरोना लसीकरणाबाबत बायडन सरकारचं नियोजन
जो बायडन 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अमेरिकेतील कोरोना विरोधातील लढा नियोजनपूर्वक लढण्याचा निश्चय बायडन यांनी आधीच व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूची बाधा 19 दशलक्ष अमेरिकींना झाली असून, आतापर्यंत 3 लाख 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. कृष्णवर्णीय समाजामध्ये कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात झाली असल्याने त्यांच्यावर प्रशासन लसीकरणादरम्यान लक्ष केंद्रित करणार आहे. कोविड-19 सल्लागार समितीसोबत बैठक झाल्यावर बायडन डेलवेअरमधील विलमिंग्टनमध्ये सद्यस्थितीबद्दल जाहीर माहिती देणार आहेत.
'कोरोनाबद्दलची अमेरिकेची सद्यस्थिती काय आहे आणि भविष्यातील काय आव्हानं आहेत याबद्दल बायडन नागरिकांशी स्पष्टपणे बोलणार आहेत. सध्याच्या प्रशासनाने कोरोना प्रश्न हाताळताना राहिलेल्या कमतरता ते लोकांसमोर मांडतील,' अशी माहिती बायडन प्रशासनातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील कोरोना परिस्थिती खूप गांभीर्याने घेतली नव्हती. शास्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्लाही ट्रम्प यांनी मान्य केला नव्हता. ही लस यायला वेळ लागणार आहे पण जनरल प्रॅक्टिशनरनी दिलेला सल्ला नागरिकांना ऐकावा आणि कोरोनापासून बचाव करण्याचे सगळे प्रयत्न करावेत असं आवाहन बायडन प्रशासनानी केलं आहे.
बायडन यांच्या कोविड-19 सल्लागार समितीतील सदस्य डॉ. अतुल गावंडेंनी सीबीएस न्यूजला सांगितलं, 'देशभरात लसीकरण करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती अद्याप आम्हाला मिळालेली नाही. ट्रम्प प्रशासनाने वास्तव लक्षात न घेता प्रत्येक नागरिकाला लस मिळेल असं जाहीर केलं होतं. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. उन्हाळ्यापूर्वी जनसामान्यांना लस उपलब्ध होईल.’
सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्तींनी एनबीसी न्यूजला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की ज्यांना आजाराचा धोका कमी आहे अशा नागरिकांना वसंत ऋतू संपताना लस उपलब्ध होऊ शकेल. सामान्यजनांना लस मिळण्यापूर्वी त्यांना ही लस मिळू शकते असं म्हणायला हरकत नाही.
अमेरिकेने आतापर्यंत फायझर-बायोएनटेक एसई आणि मॉडर्ना या दोन लशींना मान्यता दिली आहे. इतर लशींची परिणामकारकता तपासली जात आहे. कोरोना लशींसाठीचा निधी वाढवण्यासंबंधी अमेरिकी सिनेटमध्ये लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.