अंकारा, 06 फेब्रुवारी : मध्य पूर्वेकडील चार देशांना लागोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. यात तुर्की, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे. या चारही देशात मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जिवीतहानी झाली आहे. भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान तुर्कीचे झाले असून या एका देशातच मृतांची आकडेवारी 1 हजाराच्या वर आहे. आतापर्यंत 5 हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
तुर्की माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी भूकंपाचे दोन मोठे धक्के बसले होते. पहिला सकाळी साडे चारच्या सुमारास तर दुसरा दहाच्या सुमारास. यात दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 7.6 रिश्टर स्केल इतकी होती. याशिवाय भूकंपानंतर 78 लहान मोठ्या धक्क्यांची (आफ्टर शॉक्स) नोंद झाली. आता तिसरा भूकंपाचा धक्का 6 रिश्टर स्केल इतका होता.
हेही वाचा : भूकंपाने तुर्की, लेबनॉन, सिरियात मृत्यूचं तांडव, हजारो मृत्यूमुखी, Video Viral
सीरियात 585 जणांचा मृत्यू झाला असून 1500 हून जास्त लोक जखमी झाले आहेत. दोन्ही देशातील मृतांची संख्या 1600 पेक्षा जास्त आहे. लेबनॉन आणि इस्रायललासुद्धा भूकंपाचे धक्के बसले मात्र वित्त किंवा जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीतील गाझियांटेप शहर होतं. सीरियापासून 90 किमी अंतरावर असलेल्या या शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. दश्मिक, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्या आहेत.
हेही वाचा : Photo : तुर्की, सीरिया शक्तिशाली भूंकपाने हादरलं; पहाटेच्या गाढ झोपेत मृत्यूनं गाठलं
तुर्कीवर ओढावलेल्या संकटानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीतील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच भारत सरकार मदतीसाठी साहित्यासह एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके बचावकार्यासाठी तुर्कीला पाठवत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake