मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तालिबानींविरुद्ध लढताना 'या' महिलेने गमावले तीन पती, चौथ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतेय प्रार्थना

तालिबानींविरुद्ध लढताना 'या' महिलेने गमावले तीन पती, चौथ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतेय प्रार्थना

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : आपला पती सुरक्षित राहावा यासाठी पत्नी व्रत वैकल्य, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करत असते. अशीच प्रार्थना एक महिलेनं आपल्या चौथ्या पतीसाठी केली आहे. आधीचे तीन पती लढताना शहीद झाले आणि आता आपल्या चौथ्या पतीच्या सुरक्षेसाठी ही महिला प्रार्थना करत आहे.

अफगाणिस्तानमध्ये सैन्य आणि तालिबानमध्ये सतत संघर्ष सुरू असतो. अमेरिकन सैन्यदेखील मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये आहे. मात्र अजूनही तालिबानवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. तालिबानबरोबरच्या या संघर्षात अनेक अफगाणी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. एका अफगाणी महिलेला तालिबानविरुद्धच्या युद्धात आपले तीन पती गमावले. विशेष म्हणजे या महिलेचे हे तिन्ही पती हे एकमेकांचे सख्खे भाऊ होते. जवळपास 60 अफगाणी सैनिकांना या तालिबानविरुद्ध संघर्षात आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर आता या महिलेचा चौथा पती देखील सैन्यात असून तो देखील तालिबान्यांविरुद्ध लढत आहे.

हे वाचा-आजोबांनी तिला लग्नासाठी नटलेलं पाहावं यासाठी नातीनं केला 320 किमींचा प्रवास

'बीबी' असं या अफगाण महिलेचं नाव असून तिनं दिलेल्या माहितीनुसार तिचा चौथा पती अमीनुल्ला याची सीमेवर बदली करण्यात आली. यावेळी आपल्याला विधवा व्हावं लागू नये अशी आशा तिनं व्यक्त केली आहे. तिला पाच मुलं असून तिचा पहिला पती हा अफगाण सैन्यामध्ये होता. वयाच्या 18 व्या वर्षी तिचं पाहिलं लग्न झालं होतं. मात्र तालिबान्यांशी झालेल्या संघर्षात त्याला आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर तिचं लग्न त्याच्या लहान भावाशी लावून देण्यात आलं. मात्र त्याला देखील तालिबान्यांनी मारून टाकलं. त्यानंतर आपल्या सासऱ्यांच्या आग्रहामुळं तिन तिसरं लग्न हे पोलीस असलेल्या त्याच्या भावाशी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा देखील 2017 मध्ये तालिबानबरोबर झालेल्या संघर्षात मृत्यू झाला. त्यानंतर मात्र तिच्या आयुष्यात अंधःकार पसरला होता.

हे वाचा-'कोरोनाला हरविण्यात लशीची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचा धक्कादायक खुलासा

मात्र आपल्या 5 मुलांच्या भवितव्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी तिनं चौथ्या भावाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पश्तुन समाजात त्याच कुटुंबातील व्यक्तींशी लग्न करण्यास परवानगी आहे. त्यामुळे तिनं चौथं लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या या आयुष्याविषयी ती म्हणते,' कधीकधी मी तालिबानला दोष देते तर कधीकधी अफगाण सरकारला. मात्र माझ्या नशिबात हे लिहिलं असल्यानं मी याचा स्वीकार करत आयुष्य जगत आहे.' 33 वर्षीय बीबी आपल्या पतीसह 15 जणांच्या कुटुंबात कुणार जिल्ह्यातील सादिकाबाद इथं राहते. मात्र आता तिला शांतता प्रस्थापित होण्याची आशा असून आपण चौथ्यांदा विधवा होणार नाही, अशी आशादेखील आहे.

First published: