Home /News /videsh /

'मी जिवंत आहे!' हे सिद्ध करण्यासाठी ही महिला देतेय 3 वर्ष लढा

'मी जिवंत आहे!' हे सिद्ध करण्यासाठी ही महिला देतेय 3 वर्ष लढा

अनेकदा या कागदपत्रांमध्ये घोळ झाल्याने कधीकधी मृत व्यक्ती जिवंत दाखवली जाते तर कधी जिवंत समोर उभा माणूसही बँकेच्या मयतांच्या यादीत असतो. भारतात असी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, पण सध्या फ्रान्समध्येही असाच एक प्रकार घडला आहे.

    पॅरिस, 22 जानेवारी: भारतात सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्यांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी आपण जिवंत असल्याचा दाखला बँकेत सादर करावा लागतो. त्याला हयातीचा दाखला म्हणतात. त्यात आपण जिवंत आहोत असं लिहून द्यावं लागतं. अनेकदा या कागदपत्रांमध्ये घोळ झाल्याने कधीकधी मृत व्यक्ती जिवंत दाखवली जाते तर कधी जिवंत समोर उभा माणूसही बँकेच्या मयतांच्या यादीत असतो. हे फक्त भारतातंच घडतं असं नाही. फ्रान्समध्येही असाच एक प्रकार घडला आहे. जेनी पाउचेन नावाची 58 वर्षांची महिला देखील आपण जिवंत असल्याचं न्यायालयात सिद्ध करण्यासाठी लढा देत आहे. काय आहे प्रकरण? 2017 मध्ये जेनीचं डेथ सर्टिफिकेट उपलब्ध नसतानाही तिला लायन कोर्टात मृत घोषित करण्यात आलं होतं. हा निर्णय पाउचेनच्या आधीच्या क्लिनिंग कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्याबरोबर झालेल्या कायदेशीर वादात देण्यात आहे, जी 20 वर्षांपूर्वी नोकरी गमावल्यानंतर नुकसान भरपाईची मागणी करत होती. त्यामुळे सरकारी कागदपत्रांत जेनीची मयत म्हणून नोंद झाली आणि तिथपासून सुरू झाला जेनी आणि तिच्या कुटुंबियांचा त्रास. प्राथमिक स्तरावर फ्रान्समधील प्रुडहोम कामगार न्यायालयातही तिच्याविरुद्ध निकाल आला. नुकसान भरपाई द्यायला कंपनी बांधिल नसल्याचा दावा जेनीने केला होता पण तो न्यायालयाने फेटाळला अशी माहिती तिचे वकील सिल्वेन कॉर्मियर यांनी दिली. फ्रान्समधील सर्वोच्च कोर्ट ऑफ कॅसेशननेही (Court of Cassation) आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचं सांगत या प्रकरणी सुनावणीच नाकारली. जेनी, तिचा नवरा आणि मुलगा यांना कोणालाही कोर्टाचं सुनावणीला येण्याचं समन्सही आलं नाही त्यामुळे कोर्टाने 2017 मध्ये जेनी मृत झाल्याचा निकाल दिला. त्याचबरोबर जेनीविरुद्ध दावा ठोकलेल्या माजी कर्मचाऱ्याला 14 हजार युरोंची नुकसान भरपाई  जेनीचा नवरा आणि मुलानी द्यावी असा आदेशही कोर्टाने दिला, असंही जेनी आणि तिच्या वकिलांनी सांगितलं. (हे वाचा-या माणसानं केलीत तब्बल 27 लग्नं, आहेत 150 मुलं, आता TikTok मुळे झालाय लोकप्रिय) सरकारच्या दृष्टिकोनातून जेनी जिवंत नसल्याने तिला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. पहिलं म्हणजे तिला कोर्टात आपण हयात असल्याचं सिद्ध करण्यासाठी लढावं लागतंय. त्यातच कर्ज थकित राहिल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिची कार जप्त केली आहे. आता ते घरातील फर्निचरही घेऊन जातील अशी भीती तिला वाटत आहे. यामुळे  ती खूप ताणाखाली आहे. लॉरी भागातील सेंट जोसेफ गावात राहणारी जेनी फोनवर  म्हणली, ‘ मी अस्तित्त्वातच नाही आहे. सध्या मी काही करत नाही नुसती व्हरांड्यात बसून असते.’ जेनीचे वकील कॉर्मियर यांनी सोमवारी एक याचिका कोर्टात दाखल केली असून 2017 मध्ये न्यायाधीशांच्या चुकीमुळे दिला गेलेला जेनीच्या मृत्युचा आदेश मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. ते म्हणाले, ‘पहिल्यांदा मला माझ्या आशीलावर विश्वासच बसला नाही. मी या आधी अशी अजब केस पाहिली नव्हती.’ ज्या माजी कर्मचारी महिलेने जेनीविरुद्ध खटला भरला आहे तिच्या वकिलाने अनेकदा विनंती करूनही प्रतिक्रिया दिलेली नाही. कॉर्मियर म्हणाले, ‘एवढी मोठी चूक असताना ती सामान्यपणे कुणी मान्य करत नाही. पण न्यायाधीशांची चूक मान्य करून हे प्रकरण निकाली निघायला हवं.’ जेनी आणि तिच्या वकिलांना ही शेवटची संधी आहे आणि त्यातूनच जेनी जिवंत असल्याचं कोर्टात सिद्ध करण्यात ते यशस्वी होतील अशी आशा त्यांनना लागून राहिली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या