नवी दिल्ली, 2 मार्च : व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) निमित्ताने जरा हटके गोष्टी करण्याकडे अनेक प्रेमींचा कल असतो. अशा गोष्टी करण्यात त्यांना एक प्रकारचं थ्रिलिंग वाटतं. अनेकदा या हटके गोष्टी यशस्वी होतात आणि मनाला अपेक्षित समाधान देऊन जातात. पण काही वेळा या जरा हटके गोष्टी जीवावरसुध्दा बेततात. होय, अशी काहीशी घटना नुकतीच युक्रेनमध्ये उघडीस आली. आपल्या जोडीदाराने सोडून जाऊ नये यासाठी जरा हटके करण्याच्या नादात एका तरुणीला रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं.
अॅलेक्झांडर (Alexander) आणि व्हिक्टोरिया (Victoria) हे युक्रेनमधील ( Ukraine) कपल काही दिवासांपूर्वी खूप चर्चेत होतं. त्यांनी एक प्रयोग म्हणून एकमेकांना एकाच बेडीत किंवा हातकडीत (Handcuffs) अडकवून घेतलं होतं. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने केलेल्या या प्रयोगाचे परिणाम नुकतेच समोर आले आहेत. या प्रयोगामुळे आता या कपलला अडचणींचा सामना करावा लागत आहे. 24 तास हातकड्यांमध्ये एकमेकांना अडकवून घेतल्याने व्हिक्टोरियाच्या हाताला फोड आले असून, जखमाही (Ulcers) झाल्या आहेत. यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. व्हिक्टोरियाचे हात सातत्याने धातूच्या संपर्कात आल्यानं तिला असा त्रास होत आहे. तिच्या हाताला सातत्याने मलम लावूनही या जखमा बऱ्या होत नसल्याचं अलेक्झांडरने सांगितलं.
या प्रयोगामुळे हे कपल सातत्याने एकमेकांसोबतच आहे. हे दोघे एकत्रच कपडे धुतात, जेवण एकत्रच बनवतात, तसेच घरातून जॉबही एकत्रच करतात. परंतु, सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करताना या दोघांना अडचण आली होती. या सर्व बाबींवर चर्चा केली असली तरी या कपलने सेक्स लाईफ विषयी काही सांगितलेलं नाही.
अवश्य वाचा - Hijab Compulsion: मुस्लीम नसाल तरी या देशात घालावा लागतो हिजाब, आता बदलणार 60 नियम
या कल्पनेविषयी बोलताना अॅलेक्झांडर म्हणाला, की व्हिक्टोरिया छोटी-छोटी कारणे सांगून सातत्याने घरातून बाहेर जात असे. मी तुला बांधून ठेवेन आणि घराबाहेर जाऊ देणार नाही, असे मी तिला एक दिवस गमतीनं म्हटलं होतं. ही चर्चा झाल्यानंतर दोन-तीन महिने एका चेनने बांधून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला.
जर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला या हातकड्या काढण्यासाठी इमर्जन्सी सेवेच्या (Emergency Service) तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल. असे केले तरच आम्ही एकमेकांपासून वेगळं होऊ. हे कपल सध्या आपला प्रयोग पूर्ण करीत आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love story, Social media, Valentine day