न्यूयॉर्क 17 नोव्हेंबर: ज्या वयामध्ये खेळायचं बागडायचं, अभ्यास करायचा त्या वयामध्ये मुलांचे आजकाल गर्लंफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असतात. त्यांच्या करामाती बघून मोठी माणसंही अनेकदा थक्क होऊन जातात. 14 वर्षाच्या मुलाने 11 वर्षाच्या गर्लंफ्रेंडला पळवून नेल्याची घटना अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये घडली आहे. हा मुलगा आपल्या घरापासून तब्बल 1900 किलोमीटर दूर गाडी चालवत गर्लंफ्रेडला घेऊन गेला होता. न्यूयॉर्कमध्ये हा प्रकार सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
केविन फिगुरोस असं या 14 वर्षीय मुलाचं नाव आहे. केविन त्याच्या गर्लंफ्रेंडला घेऊन तब्बल 1900 किलोमीटर दूर आला होता. मुलं घरात नाही त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आणि न्ययॉर्कपासून दूर आयोवा शहरामध्ये या दोन्ही मुलांचा शोध लागला. त्या मुलांना आता पुन्हा त्यांच्या घरी आणलं जाणार आहे. गुरूवारी 12 नोव्हेंबर रोजी मुलाने 11 वर्षीय मुलीला पळवून नेलं होतं. रविवारी त्यांचा शोध लागला. केविनने आपल्या वडिलांची मिनीव्हॅन नेली होती. त्या दोघांचाही तपास लागल्यानंतर त्यांच्या आई वडिलांचा जीव भांड्यात पडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केविन 150 किमी प्रति तास वेगाने गाडी चालवत होता. तिथे वेगाची मर्यादा 104 किमी आहे. केविनने हे पाऊल का उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याचा तपास सध्या सुरू आहे. पौंगडावस्थेतील मुलांची मनस्थिती अतिशय वेगळी असते. त्यांच्या शरीरात आणि विचारसरणीमध्ये अनेक बदल होत असतात. अशावेळी पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं आवश्यक आहे. आपली मुलं कुठल्या चुकीच्या संगतीत नाहीत ना याचाही विचार करणं गरजेचं आहे.