पाकिस्तानात उत्खननात सापडलं भगवान विष्णूचं 1300 वर्षे जुनं मंदिर; काय आहे त्याचा इतिहास

पाकिस्तानात उत्खननात सापडलं भगवान विष्णूचं 1300 वर्षे जुनं मंदिर; काय आहे त्याचा इतिहास

इटालियन पुरातत्त्व मिशनचे प्रमुख डॉक्टर लुका म्हणाले की स्वात जिल्ह्यात सापडलेल्या गांधार संस्कृतीतील हे पहिले मंदिर आहे.

  • Share this:

कराची, 20 नोव्हेंबर : तेराशे वर्षांपूर्वी बांधलेलं हिंदू मंदिर (Hindu Temple) वायव्य पाकिस्तानच्या (Pakistan) स्वात जिल्ह्यातल्या एका पर्वतावर पाकिस्तानी आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी शोधले आहे. बारिकोट घुंडई येथे उत्खननादरम्यान हा शोध लागला आहे. गुरुवारी या शोधाची घोषणा करताना खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी सांगितलं की, सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूंचं आहे. हिंदू शाही काळातील हिंदूंनी 1300 वर्षांपूर्वी ते बांधले होते.  हिंदू शाही किंवा काबूल शाही हा इसवी सन पूर्व काळापासून असलेले हिंदू राजवंश होते. ज्यांचं साम्राज्य काबुल खोरं (पूर्व अफगाणिस्तान), गंधार (आधुनिक पाकिस्तान) आणि सध्याच्या वायव्य भारतावर होतं. या उत्खननादरम्यान पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिराच्या जागेजवळ छावण्यांचे आणि टेहळणी बुरुजांचे अवशेषसुद्धा सापडले.

तसेच या तज्ज्ञांना मंदिराच्या जागेजवळ पाण्याचा तलावही सापडला. हिंदू भाविक देवदर्शनापूर्वी स्नानासाठी या तलावाचा वापर करत असतील असा त्यांचा अंदाज आहे. तसेच ते म्हणाले की स्वात जिल्ह्यात हजारो वर्षे जुनी पुरातन ठिकाणं आहेत. परंतु हिंदुशाही काळातील खुणा पहिल्यांदा त्या भागात सापडल्या आहेत. इटालियन पुरातत्त्व मिशनचे प्रमुख डॉक्टर लुका म्हणाले की स्वात जिल्ह्यात सापडलेल्या गांधार संस्कृतीतील हे पहिले मंदिर आहे.

हे ही वाचा-या देशात महिला पोलिसांना अधिकृत गणवेशात हिजाब घालण्याची परवानगी

नैसर्गिक सौंदर्य, धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि पुरातन वास्तू अशा प्रत्येक प्रकारची पर्यटन स्थळ स्वात जिल्ह्यात आहेत. बौद्ध धर्माची अनेक पूजास्थळंही स्वात जिल्ह्यात आहेत. ब्रिटिशांनी 1947 मध्ये भारताची फाळणी करून मुस्लिमबहूल पाकिस्तान देशाची निर्मिती केली. त्याआधीपासून काबुलपर्यंत हिंदू वसाहती होत्या त्यामुळे त्या भागात अनेक मंदिर अजूनही आहेत. फाळणीनंतर अनेक हिंदू धर्माशी निगडित वास्तू पाकिस्तानमध्ये गेल्या. त्यानंतर आता या उत्खननाच्या वेळी या हिंदू मंदिराचा शोध लागला आहे. पाकिस्तान सरकारची परवानगी घेऊन हिंदू नागरिक या मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतात. स्वात जिल्ह्यात अनेक गोष्टी आहेत ज्याने पाकिस्तानला अनेक पर्यटक भेट देतात. त्यात आता हे तेराशे वर्ष जुने हिंदू मंदिर सापडल्याने अनेक हिंदू नागरिक पाकिस्तानला भेट देण्याची शक्यता आहे. यामुळे आता स्वात जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला देखील थोडीफार चालना मिळेल. भगवान विष्णूंचे असलेले हे पुरातन मंदिर पाकिस्तानात सापडल्यामुळे या गोष्टीची खूपच चर्चा होत आहे. हा वारसा जपला जाणं गरजेचं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 20, 2020, 9:16 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या