जितेंद्र जाधव, बारामती, 08 फेब्रुवारी : अजित पवार म्हणजे बिनधास्त, बेधडक व्यक्तिमत्व...गावरान, रांगडा स्वभाव...आपल्या हटके अंदाजामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. दादांना शुक्रवारी पान खायची तलफ आली आणि मग काय विचारता..त्यांनी थेट पानाची टपरी गाठली. बारामतीच्या त्या गार वाऱ्यात अजित पवार पान खाण्यासाठी पणदरे इथल्या एका छोट्या पान स्टॉलवर थांबले. मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या अजितदादांनी पानवाला पान बनवेपर्यंत त्याच्याशी हवापाण्याच्या गप्पासद्धा मारल्या. तसंच दुकानात कोणतं पान मिळतं इथपासून ते किती धंदा होतो, अशी सगळी विचारपूसही केली.पानवाल्यानं पान बांधल्यानंतर मस्तपैकी पानाचा तोबरा भरला. परिवर्तन यात्रेवेळी त्यांनी आपला डाएट बाजूला ठेवत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात जेवणावर ताव मारला होता. आता बारामतीचं पान खाऊन अजितदादा काय धमाल उडवून देणार आणि कुणाची 'चाल सीधी' करणार आहेत, ते बघायचं...