चंदीगड, 2 फेब्रुवारी : चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) प्रकोपानंतर प्रत्येक देशाने चीनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. भारताने तब्बल 647 भारतीयांना वुहानमधून बाहेर काढलं. भारतात परतताच या भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा आहे. महाभयंकर अशा चिनी व्हायरसच्या विळख्यातून सुटल्याचा आनंद या भारतीयांनी व्यक्त केला आहे. त्यांचा या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चीनहून भारतात परतल्यानंतर या लोकांना खबरदारी म्हणून एका विशेष मेडिकल कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे, ज्यामुळे ते अजूनही आपल्या घरापासून दूर आहेत. मात्र तरीही मायदेशी परतल्यांचा आनंद किती असेल, याची कल्पना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच येऊ शकतो. व्हिडिओत हे सर्व भारतीय मास्क घालून डान्स करताना दिसत आहेत.
चीनच्या वुहानमध्ये (Wuhan)कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रकोप आहे, डिसेंबर 2019 पासून इथूनच हा व्हायरस पसरत गेला. जो फक्त चीनमध्येच नव्हे तर इतर देशांपर्यंतही पोहोचला. त्यामुळे तिथल्या भारतीयांना आपल्या देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या. एकूण 647 भारतीयांना वुहानहून भारतात आणण्यात आलं.
मात्र खबरदारी म्हणून त्यांना हरयाणातील मानेसरमध्ये ठेवण्यात आलं आहे. जिथं त्यांच्यासाठी सोयीसुविधांनीयुक्त असं विशेष मेडिकल कॅम्प उभारण्यात आलं आहे. अद्याप तरी यापैकी कुणामध्येही कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आली नाहीत. आणखी 14 दिवस या सर्वांना इथंच ठेवलं जाणार आहे. त्यांच्यामध्ये जर कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली नाही तर त्यांना त्यांच्या घरी सोडलं जाणार आहे.
केरळात दुसरा रुग्ण
दरम्यान भारतात कोरोनाव्हायरसचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. तर चीनमध्ये 304 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 14 हजार पेक्षा जास्त जणांना लागण झाली आहे.