जळगाव, 11 नोव्हेंबर : 'अवनी'या वाघिणीच्या हत्येचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत रविवारी जळगावात वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीनं कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी वन्यजीव प्रेमींनी अवनीचा प्रतिकात्मक पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तिला श्रद्धांजली वाहिली. यावेळी दोन लहान मुले वाघिणीच्या बछड्यांचे रूप घेऊन ''आमची आई कुठे आहे?'' असं लिहिलेला फलक हातात घेऊन या कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होतेच. अवनीची हत्या ठरवून केली गेली, की स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी केली गेली? ज्या शिकाऱ्याला परवानगी दिली होती त्याने ही हत्या न करता त्याच्या मुलाने ही हत्या कशी काय केली? तिची हत्या करण्याऐवजी तिला बेशुद्ध करून तिला ताब्यात का घेतले नाही? तिच्या पिल्लांनाही अशाप्रकारे मारणार का? या प्रश्नांचं प्रशासन आणि वनविभाग यांच्याकडे उत्तर आहे का? असे अनेक प्रश्न यावेळी वन्यजीव प्रेमिंनी उपस्थित केले.