15 जानेवारी : "ये आदमी नही मुकम्मल बयान है ; माथे पे इसके चोट का गहरा निशान है ; सामान कुछ नही, फटे हाल है मगर ; झोली में इसके जरूर कोई संविधान है..." हा हिंदी शेर लागू होतो नामदेव ढसाळ यांना...सर्वात जास्त परदेशी भाषांमध्ये जर कुठल्या मराठी कवीच्या कविता भाषांतरित झाल्या असतील तर तो मान आहे ढसाळांचा..
वडलांचं बोट धरुन वयाच्या सातव्या वर्षी नामदेव ढसाळ मुंबईत आले. एका बाजूला ग्रँट रोड आहे, दुसर्या बाजूला बेलासिस रोड आहे, पुर्वेला कामाठीपुरा आहे, तर दक्षिणेला नळबाजार आहे. त्यामुळे गावाचं जे नष्टचर्य होतं, त्याची नाळ इथं आल्यावर तुटली नाही. अत्यंत भयानक स्वरूपाचं जीवन वाट्याला आलं. मुंबईतील बकाल वस्तीतल्या अनुभवानं नामदेव ढसाळ यांंच्यातील कवी घडला. ते जहाल वास्तव उतरलं 'गोलपीठा' या कवितासंग्रहात. या कवितांनी मराठी साहित्यात क्रांती घडवून आणली. मराठी साहित्याला मानवी चेहरा दिला. त्यांच्या अनेक कविता ज्येष्ठ साहित्यिक दिलीप चित्रे यांनी भाषांतरीत केल्या.
दिलीप चित्रे म्हणतात, "केवळ दलित कवी म्हणून नव्हे तर मराठी कवी म्हणून आणि समकालीन कविता मी जी अनेक भाषांमध्ये वाचत होतो, त्यामध्ये नामदेव ढसाळांसारखा तीव्र आणि प्रखर स्वर असलेला आणि भाषेची मोडतोड करून तिचा नव्या पद्धतीनं उपयोग करू शकणार्या कवी माझ्या पाहण्यात नव्हता."
नामदेव ढसाळांच्या कवितांचे इंग्रजीबरोबर जर्मन, फ्रेंच, रशियन अशा अनेक भाषांत अनुवाद झालेत आणि त्या सर्वच भाषांत त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागतही करण्यात आलं.
प्रबोध पारिख म्हणतात, "अनेक भाषा में उनके अनुवाद पढकर लोगोंको लगे की हम मराठी सिखनी चाहिए. ही इज इंटरनॅशनल पोएट बिकॉज ही इज ब्रिलियंट मराठी पोएट."
आणि म्हणूनच मराठीतील जागतिक दर्जाचा कवी ही त्यांची ओळख कायम आहे.