- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Hampi | हंपी: इतिहास आणि पौराणिक कथा जिवंत करणारी नगरी!

हंपीत (Hampi) इतिहास आणि पौराणिक कथा जिवंत होतात, असं म्हणतात ते काही खोटं नाही. हे आम्ही का म्हणतोय हे लेख वाचल्यानंतर लक्षात येईलच. हंपी हे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं खूप जुनं आणि प्रसिद्ध शहर आहे.
- News18 Lokmat
- Last Updated: Dec 29, 2021 08:45 PM IST
मुंबई, 2 डिसेंबर: खरंतर माणसाच्या जन्माअगोदरपासूनच शुक्राणूच्या रुपाने सुरु झालेला प्रवास मरेपर्यंत सुरुच असतो, अगदी मृत्यूनंतरही आत्माच्या रुपात तो सुरुच असल्याची धारणा आपल्याकडे आहे. एकूणच काय तर माणूस आणि प्रवास हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच कामाव्यतीरिक्तही माणूस आनंद मिळवण्यासाठी प्रवास करत असतो. तुम्हालाही भटकायला आवडत असेल तर तुमच्यासाठी मस्त प्लॅन आहे. तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी पहायची आवड असेल तर उत्तमच पण नसेल तरी हा लेख वाचून तुम्हीही म्हणाला आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी भटकायलाच हवं.
हंपी.. प्रत्यक्षात अवतरलेली स्वप्ननगरी History of Hampi
हंपी हे कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात स्थित एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक गाव आहे, जे केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. इतिहासाच्या पानांमध्ये उपस्थित असलेल्या सर्वात समृद्ध साम्राज्यांपैकी एक असलेल्या विजयनगर साम्राज्यातील अनेक मंदिर समूहांचे अवशेष आपल्याला हंपीत अजूनही पहायला मिळतात. हंपीसाठी ही अभिमानाची बाब आहे की, येथील अनेक मंदिरे आणि स्मारके युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्यात आली आहेत. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले हंपी सुंदरच नाहीतर इतिहासाने समृद्ध आहे. हंपी हे 7 व्या शतकातील हिंदू विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर आणि दगडी रथांसाठीही प्रसिद्ध आहे. तुम्हालाही इतिहासात रस असेल आणि हंपीला भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला हंपीला कसं पोहचायचं आणि तिथं काय पहायला मिळेल हे सांगणार आहोत.
..म्हणूनच कानडा राजा पंढरीचा असं म्हणतात
एखाद्या सौंदर्यवर्तीचं वर्णन करताना म्हटलं जातं की देवानं नक्कीच निवांत वेळ काढून हिला साकारलं असणार. असाच काहीसा अनुभव या ठिकाणी येईल. मात्र, हा काही देवाचा चमत्कार नाहीय. वास्तुविशारदाच्या कल्पनेतून जगप्रसिद्ध शिल्पांनी सजलेली सारी नगरी इथं जशीच्या तशी उभी आहे. हंपी आणि महाराष्ट्राचं तर वेगळं नातं सांगितलं जातं. सकल महाराष्ट्राचा पांडुरंग अर्थात विठ्ठलाची हिच तर भूमी. हंपी मधील विठ्ठल मंदिर पाहताना असंच काहीसं वाटत होतं. इथला विठ्ठल हल्लेखोरांच्या भितीनं महाराष्ट्रातल्या पंढरपूरात नेऊन लपवला अशी एक दंतकथा सांगितली जाते म्हणूनच कानडा राजा पंढरीचा, असेही तुम्ही अभंगातून ऐकलं असेलच.
हंपीचे विठ्ठल मंदिर 16व्या शतकात बांधले गेले. हे त्या भागातील सर्वात सुंदर मंदिर आहे. हे विजयनगरच्या वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुना आहे. भव्य कोरीव कामात साकारलेलं हे मंदिर हंपीतील सर्वात लोकप्रिय मंदिर आहे. विठ्ठल मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रांगणात असलेला भव्य दगडी रथ.
हंपीत इतिहास आणि पौराणिक कथा जिवंत होतात
कमल महालामध्ये एक मंदिर आहे, इथं भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असे सांगितले जाते. या संकुलात राण्यांसाठी स्नानगृहही बांधण्यात आले होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले हे ठिकाण प्रत्येक वळणावर इतिहासाचे नवे पैलू दाखवते. बलाढ्य विजयनगर साम्राज्याखाली बांधलेल्या भव्य वास्तू आता भग्नावस्थेत असल्या तरी त्या हंपीच्या समृद्ध भूतकाळाची साक्ष देतात. ते 1336 आणि 1646 मध्ये उपस्थित होते.
खडकावर हनुमान आणि इतर देवतांच्या मूर्ती
भारतीय महाकाव्य रामायणातही हंपीचा उल्लेख आहे. असे म्हणतात की येथे पूर्वी किष्किंध वानरांचे राज्य होते. 2019 मध्ये न्यू यॉर्क टाईम्सच्या 'मस्ट-व्हिजिट डेस्टिनेशन' यादीत हंपीला दुसरे स्थान मिळाले आहे.
विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी
हंपी ही विजयनगर साम्राज्याची शेवटची राजधानी होती. हे दक्षिण भारतातील महान राज्यांपैकी एक होतं. तिथल्या श्रीमंत राजांनी अनोखी मंदिरे आणि राजवाडे बांधले होते, ज्यांना 14व्या आणि 16व्या शतकात दूरदूरच्या प्रवाशांनी भेट दिली होती. हंपी नंतर लुटीने उद्ध्वस्त झाले असले तरी इथं अजूनही 1600 पेक्षा जास्त इमारती आहेत, ज्यात राजवाडे, किल्ले, स्मारक संरचना, मंदिरे, स्तंभ असलेले सभागृह आणि कॉरिडॉर यांचा समावेश आहे.
दगडी मंदिरांचे दृश्य
हंपी सुंदर परिसरात वसलेले आहे. अनेक किलोमीटर लांबीचा खडबडीत भूभाग आणि अनेक मोठे खडक यामुळे हे पर्वत गिर्यारोहण, ट्रेकिंग आणि अनेक साहसी खेळांची आवड असलेल्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. जिथे हे खडक होते, तिथे आज अनेक खजुरीची झाडे, केळीची लागवड आणि भातशेती आहेत. आज हे शहर एक पर्यटन केंद्र आहे. इथं अनेक भाविक, साहसप्रेमी आणि साहस येत असतात.
विरुपाक्ष मंदिर
विरुपाक्ष मंदिर हे या भागातील सर्वात जुन्या वास्तूंपैकी एक आहे. हे हंपी बाजारात असून 7 व्या शतकात बांधले गेले. असे म्हणतात की हे मंदिर भगवान शंकरासाठी बांधले गेले होते. या मंदिराचा गोपुरम इतका उंच आहे की तो आकाशाला भिडल्याचा भास होतो. त्याच्या बाह्यभागात प्लास्टरची शिल्पे बनवण्यात आली आहेत, त्यामुळे मंदिराला एक खास ओळख प्राप्त झाली आहे.
विरुपाक्ष मंदिर हे हंपीमधील एकमेव मंदिर आहे, ज्यामध्ये सुरुवातीपासून पूजा केली जात आहे. त्यात गर्भगृह आणि अंगण आहे. अंगणात खांब आहेत. यापैकी सर्वात मोठे, 100 खांब असलेल्या मंदिरात समोरच्या खोल्या, मोठे गोपुरम आणि अनेक लहान मंदिरे आहेत. तसेच मंदिरात स्वयंपाकघर आणि प्रशासकीय कार्यालय देखील आहे.
डिसेंबरमध्ये, विठ्ठल, या मंदिराची मुख्य देवता विठ्ठलाचा विवाह देवी पंपाशी झाल्याचा सोहळा साजरा केला जातो. यावेळी हजारो लोक येथे येतात. इथं भेट देण्याचा आणखी एक चांगला काळ म्हणजे फेब्रुवारी, जेव्हा वार्षिक रथ-उत्सव साजरा केला जातो.
काय मग हंपीला जायचा विचार येतोय ना मनात? आता जायचं कसं तेही सांगतो.
रोड ट्रीप करत रस्त्याने जायचंय?
हंपी मुंबईपासून 742 किमी अंतरावर आहे. हा आता तुम्ही रस्त्याने जायचं ठरवलच आहे तर मग सातारा, कोल्हापूर आणि बेळगावी सारख्या जिल्ह्यातून जावं लागेल. त्यामुळे तुमची ट्रिप जोरात होणार यात शंका नाही. मांसाहारी असाल तर तांबडा-पांढऱ्या रश्यावर ताव मारल्याशिवाय जाऊ नका. हंपीला जाण्यासाठी साधारण 12 ते 13 तास लागू शकतात.
स्वस्त आणि मस्त आपली रेल्वे
हंपीला सर्वात जवळचे रेल्वेमार्ग हॉस्पेट आहे. मुंबई ते हंपी ट्रेनने जाण्यासाठी तुम्ही एसबीसी गरीब नवाज रेल्वेने मुंबईहून होस्पेटला जाऊ शकता, त्यानंतर कॅब घ्या किंवा हॉस्पेट ते हंपीपर्यंत खाजगी वाहन भाड्याने घेऊ शकता. हॉस्पेट ते हंपी हे अंतर फक्त 13 किमी आहे. तिथं पोहोचण्यासाठी सुमारे 27 मिनिटे लागतात.
विमानाने जाण्याचा विचार करताय?
मुंबई आणि हम्पी दरम्यान थेट विमानसेवा नाही. मुंबईहून विमानाने हम्पीला जाण्याचा सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे गोव्याला जाण्यासाठी विमानाने जाणे आणि नंतर बस किंवा कॅबने हंपीला जावं लागेल. गोवा ते हंपी हे अंतर 316 किमी आहे. तुम्ही बेळगावला देखील उड्डाण करू शकता आणि नंतर बेळगाव ते हंपी हा रस्ता मार्ग घेऊ शकता. बेळगाव ते हंपी हे अंतर रस्त्याने 266 किमी आहे.