मुंबई, 1 फेब्रुवारी : कधी कधी छोटं घर बांधायलाही काही महिने लागतात. यात खूप पैसा खर्च होतो आणि आपला सर्वांत मौल्यवान वेळ वाया जातो. काही वेळा या सर्व चक्रात अडकून मोठं नुकसानही होतं. कारण विटांसह अनेक वस्तूंची तजवीज आपल्यालाच करावी लागते. मग त्याची देखभाल आणि इतर सर्व प्रकारचे त्रास आलेच; पण आता लवकरच हा त्रास संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जर्मनीमध्ये एका खास तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे अगदी काही तासांत मोठ्या इमारतींचं बांधकाम पूर्ण होऊ शकणार आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम अगदी कमी खर्चात पूर्ण होणार आहे. हे तंत्रज्ञान नेमकं कसं आहे ते जाणून घेऊ या.
dieche vale च्या वृत्तानुसार, हे एक असं तंत्र आहे, की ज्यात कामाचा वेग दुप्पट होईल. या तंत्रज्ञानानुसार इमारतीचं बांधकाम विटांवर विटा रचून नाही, तर मॉड्युलवर मॉड्युलने पूर्ण केले जाते. आपण घरासाठी जे स्टील आणि काँक्रीट वापरतो, त्यापासून हे मॉड्युल तयार केले जातात तेही अवघ्या तीन ते चार तासांत. तुमचं घर लहान विटांऐवजी काही मोठ्या विटांनी बांधले जाईल, असं तुम्ही समजू शकता. या मोठ्या विटा स्टील आणि काँक्रीटपासून बनवल्या जातात.
50 टक्क्यांपर्यंत बचत
या प्रत्येक मॉड्युलचे वजन सुमारे 30 टनापर्यंत असतं. त्यामुळे क्रेनच्या मदतीनं हे मॉड्युल एकावर एक रचले जातात. या तंत्राला मॉड्युलर कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. जर्मनीमध्ये या तंत्राचा वापर करून घर बांधणाऱ्यांची संख्या वेगानं वाढत आहे. पीडीपी कन्स्ट्रक्शन या इमारत बांधकाम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे इमारतींच्या बांधकामात सुमारे 50 टक्के बचत होत आहे. म्हणजेच जी इमारत बांधण्यासाठी एक कोटी रुपये खर्च येतो, ती या तंत्राच्या मदतीने अवघ्या 50 ते 60 लाख रुपयांत बांधता येते.
वाचा - स्टेशनवरील Free Wifi वापराल तर कामातून जाल, धक्कादायक पोलखोल
नव्या घरात अगदी लगेच
या इमारती उभारण्यासाठी मजूर आधी सिमेंटचा आधार तयार करतात. मग त्यावर मॉड्युल फिट केली जातात. अगदी काही मिनिटांत एक खोली बांधून तयार होते. हेच काम विटांच्या मदतीने करण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागतात. या इमारती अशा असतील, की त्यामध्ये लगेच राहायला जाता येईल. म्हणजेच तुम्ही फक्त एका दिवसात तुमच्या नव्या घरात रहायला येऊ शकता, असा विचार करायला काहीच हरकत नाही.
सर्व पाइप प्री-फिटेड असतात
विशेष म्हणजे, या मॉड्युलमध्ये पाणी आणि हीटिंगचे सर्व पाइप प्री-फिटेड असतात. याचा अर्थ यासाठी तुम्हाला वेगळी तोडफोड करण्याची गरज पडत नाही. या सर्व गोष्टी कारखान्यात जोडलेल्या असतात. जागेवर फक्त त्या एकमेकांशी जोडल्या जातात. शॉवर, बेड आणि टेबलदेखील तयार असतात. रूममध्ये या गोष्टी फक्त आणून जोडल्या जातात. या मॉड्युलमध्ये इंटरनेट कनेक्शनही असतं. या कनेक्शनसाठी कोणतीही तोडफोड करावी लागत नसल्याने अजिबात आवाज होत नाही. हे कनेक्शन प्री-कनेक्टेड असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Technology