नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: लहानपणी आकाशात उडणाऱ्या विमानाचा (Airplane)आवाज आला की घरातून धावत बाहेर येऊन आकाशात विमान कुठं दिसतंय का, हे पाहण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला असेल. आजही विमानाचा आवाज आला की नकळत का होईना अनेकांची नजर आकाशाकडे वळते. विमान प्रवास करणं हे बहुतेक लोकांचं मोठं स्वप्न असायचं. मात्र आजकाल विमान प्रवास ही पूर्वीसारखी अपूर्वाई राहिलेली नाही. अगदी सहजपणे देशांतर्गत आणि परदेशात विमान प्रवास केला जातो. त्यामुळे काही गोष्टी आता लक्षातही येत नाहीत. लहानपणापासून आकर्षण असणाऱ्या विमानाबाबत एक छोटीशी गोष्ट कधी तुमच्या लक्षात आली आहे का? तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की विमानाचा रंग (Airplane Colour) प्रामुख्याने पांढरा (White) असतो. कुतूहल वाढलं ना? पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं त्याचप्रमाणे विमानाचा रंग पांढरा असण्यामागेही अत्यंत महत्त्वाची शास्त्रीय कारणं आहेत. ही छोटीशी गोष्ट इतकी महत्त्वाची आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, विमानाचा रंग पांढरा ठेवण्यामागील सर्वांत मोठं शास्त्रीय कारण म्हणजे पांढरा रंग सूर्याच्या किरणांपासून (Sun Rays) विमानाचं रक्षण करतो. पांढरा रंग उष्णतेचा (Heat) दुर्वाहक आहे. धावपट्टीपासून आकाशापर्यंत विमानं नेहमी उन्हात असतात. धावपट्टीवर असो किंवा आकाशात, सूर्याची किरणं नेहमी त्यांच्यावर थेट पडतात. ही इन्फ्रारेड किरणं (Infrared Rays) विमानाच्या आत तीव्र उष्णता निर्माण करू शकतात. पांढरा रंग सूर्याच्या 99 टक्के किरणांना परावर्तित करतो. त्यामुळे विमानाला पांढरा रंग दिला जातो.
हेही वाचा- पुढील 10 दिवसांत या Smartphone वर कायमसाठी बंद होणार WhatsApp, या युजर्ससाठी आता केवळ एकच पर्याय
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पांढऱ्या रंगामुळे विमानावरील कोणत्याही प्रकारची भेग किंवा चरा सहज दिसू शकतो. विमानाचा रंग पांढऱ्याऐवजी इतर कोणता असेल, तर भेगा लपल्या जातील. त्यामुळे विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. पांढरा रंग विमानाच्या देखभालीसाठी आणि तपासणीसाठी उपयुक्त ठरतो.
आणखी एक मोठं कारण म्हणजे इतर सर्व रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचं वजन (Weight) खूपच कमी आहे. त्यामुळे पांढऱ्या रंग दिल्याने विमानाचं वजनही कमी राहण्यात मदत होते. इतर कोणत्याही रंगाचा वापर केल्याने विमानाचं वजन वाढू शकते.आकाशात उडण्यासाठी विमानाचं वजन खूप महत्वाचे असतं.
हेही वाचा- अवघ्या 1 रुपयात घेता येईल Digital Gold! जाणून घ्या कशी कराल खरेदी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane