नवी दिल्ली, 1 डिसेंबर : भारतीय वंशाचे पराग अग्रवाल ( Parag Agarwal) आता ट्विटरचे ( Twitter) नवे सीईओ ( CEO) बनले आहेत. ही बातमी समोर आल्यापासून पराग अग्रवाल यांचं विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरसुद्धा ( social media) त्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट फिरत आहेत. सीईओ पदाचा कारभार स्वीकारताच अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये काही बदल करण्यास सुरुवात केली आहे.
ट्विटरच्या वैयक्तिक माहिती संरक्षण धोरणाचे ( personal information protection policy) नवे अपडेट्स 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार एखाद्या व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडीओ त्याच्या परवानगी शिवाय इतर कोणालाही शेअर करण्याची परवानगी नसेल. कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे माहिती दिली, की कंपनी आता त्यांच्या वैयक्तिक माहिती धोरणाची व्याप्ती वाढवत आहे. त्यामध्ये खासगी फोटो आणि व्हिडीओ समाविष्ट करण्यात आले आहेत.
आतापर्यंत कोणताही युजर दुसऱ्या युजर्सचे व्हिडीओ आणि फोटो संबंधित युजरच्या परवानगीशिवाय शेअर करू शकत होता, मात्र आता छळविरोधी धोरणं अधिक मजबूत करणं आणि महिला युजर्सची सुरक्षितता, या उद्देशाने फोटो आणि व्हिडीओ बाबत कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पर्सनल मीडियाच्या गैरवापराचा प्रत्येकावर परिणाम होऊ शकतो. याचा महिला आणि अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांवर अधिक विपरित परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही, की फोटो किंवा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यापूर्वी त्यामधील सर्व व्यक्तींच्या संमतीची आवश्यकता असेल. परंतु त्यापैकी कोणी तो फोटो किंवा व्हिडाओ ट्विटरवरून काढून टाकण्याची विनंती केली, तर ट्विटर तो काढून टाकेल.
ट्विटरने म्हटलं आहे, की 'फोटो किंवा व्हिडीओ यांसारख्या वैयक्तिक गोष्टी शेअर केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचं उल्लंघन होऊ शकतं आणि त्यामुळे भावनिक आणि शारीरिक हानीदेखील होऊ शकते.'
इतरांची वैयक्तिक माहिती उदा. त्यांचा पत्ता, ओळखीची कागदपत्रं, संपर्काची माहिती, आर्थिक माहिती किंवा वैद्यकीय डेटा शेअर करण्यावर ट्विटरने आधीच प्रतिबंध घातले आहेत.
ट्विटरची धुरा संभाळणारे पराग अग्रवाल हे आयआयटी-मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. अग्रवाल यांना 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळजवळ साडेसात कोटी रुपये इतका वार्षिक पगार असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Twitter, Twitter account