सावधान! तुम्हालाही Tiktok Pro चा मेसेज आला आहे का? लिंकवर क्लिक कराल तर...

सावधान! तुम्हालाही Tiktok Pro चा मेसेज आला आहे का? लिंकवर क्लिक कराल तर...

उत्साहाच्या भरात या लिंकवर (Tiktok app link) जाऊन टिकटॉक अ‍ॅप डाऊनलोड करणं महागात पडेल.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : भारतात टिकटॉकवर (Tiktok) बंदी घातल्यानंतर टिकटॉक वापरकर्ते आणि स्टार्स आता इतर पर्याय शोधत आहेत. टिकटॉकला पर्याय असलेल्या अ‍ॅपकडे टिकटॉक युझर्सची पावलं वळली आहेत. अशात आता कित्येकांच्या मोबाइलवर टिकटॉक अ‍ॅप लिंकचे मेसेज येऊ लागलेत. तुमच्या मोबाइलवरही असा मेसेज आला असेल आणि तुम्ही उत्साहाच्या भरात त्यावर क्लिक  करायला जात असाल तर सावध व्हा. कारण तुम्ही उत्साहात उचललेलं हे एक पाऊल महागात पडेल.

भारतात टिकटॉकवर बंदी घातलेली आहे. मात्र या अ‍ॅपचे चाहते भरपूर आहेत. याचा फायदा घेत आता सायबर भामट्यांनी फेक Tiktok Pro लिंक बनविली आहे, त्यापासून सावध राहण्याचं आवाहन महाराष्ट्राच्या सायबर विभागाने (mahrashtra cyber) केलं आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यानी दिलेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी Tiktok Pro  ही फेक लिंक बनवली आहे. एसएमएस आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर ही लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करताच अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडून मोबाइलमधील डाटा वापरण्याची सर्व परवानगी घेतली जाते आणि तुमचा डाटा चोरला जाऊ शकतो.

त्यामुळे अशा मेसेजच्या लिंकवर क्लिक करू नये, अशा लिंक्समध्ये मॅलवेअर असू शकतो. यापासून सावध राहा, असं आवाहन महाराष्ट्र सायबरने सर्व नागरिकांना केलं आहे.

हे वाचा - CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; 30 टक्के अभ्यासक्रम करणार कमी

भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचवू शकतील किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेल्या 59 चायनीज मोबाईल अ‍ॅपवर बंदी घालायचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अ‍ॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली गेली.

हे वाचा - एकेकाळी टीसी असलेल्या धोनीकडे आहे आता एकापेक्षा एक आलिशान गाड्या, पाहा हे PHOTOS

गुगल प्ले आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरूनदेखील हे अ‍ॅप हटवण्यात आलं आहे. त्यामुळे भारतात हे अ‍ॅप वापरता येणार नाही शिवाय डाऊनलोडही करता येणार नाही. टिकटॉक कंपनीदेखील भारत सरकारच्या नियमांचं पालन करत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भारतात असा कोणताही टिकटॉक अ‍ॅप नाही.

Published by: Priya Lad
First published: July 7, 2020, 6:54 PM IST

ताज्या बातम्या