नवी दिल्ली, 14 जानेवारी : व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) नव्या पॉलिसीचा अनेकांनी धसका घेतला आहे. नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षित असलेल्या इतर पर्यायांचा युजर्स सध्या शोध घेत आहेत. याचाच मोठा फायदा टेलिग्राम या मेसेजिंग ॲपला (Telegram) झालेला पाहायला मिळतं आहे. यामुळे टेलिग्रामला मागील काही तासांमध्ये मोठा फायदा झाला असून टेलिग्राम युजर्सची संख्या 50 कोटींच्यावर गेली आहे.
72 तासांत अडीच कोटी युजर्स -
व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp ) नवीन पॉलिसीनंतर अवघ्या काही तासांत टेलिग्रामने कमाल केली आहे. मेसेजिंग अॅपमध्ये (Messaging App) गेल्या 72 तासांत अडीच कोटी नवीन युजर्स जोडले गेले आहेत. कंपनीने हे युजर्स जगभरातून जोडले आहेत. मात्र सर्वात जास्त 38 टक्के युजर्स हे आशियातील आहेत. 27 टक्के युजर्स हे युरोपमधील आहेत. 21 टक्के युजर्स हे लॅटिन अमेरिकेतील, तर 8 टक्के युजर्स हे उत्तर आफ्रिकेतून आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सहा ते दहा जानेवारी या पाच दिवसांत 15 लाख नवीन युजर्स जोडले गेले आहेत असं टेलिग्राम कंपनीने पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
भारतात सर्वात जास्त मोबाईल युजर्स (Indian Mobile Users) आहेत. यामुळे सर्वात जास्त डेटा भारतात तयार होत असल्याने इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांमध्ये देखील आघाडीवर आहे. भारतात 30 ऑक्टोबरपर्यंत 117 कोटी फोनची कनेक्शन होती. यामध्ये 115 कोटी मोबाईल युजर्स आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर देखील होतो.
काय आहे व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी -
लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने नव्या वर्षात नवीन प्रायव्हसी पॉलिसी (New Terms and Policy) आणली आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत या अटी स्वीकारणं युजरसाठी अनिवार्य आहे. जर अटी स्वीकारल्या नाहीत तर 8 फेब्रुवारीनंतर हे अॅप वापरताच येणार नाही. या पॉलिसीमध्ये कंपनीने हा डेटा फेसबुकबरोबर (Facebook) शेअर होत असल्याचं म्हटलं होतं. यामुळे अनेकांनी याला विरोध दर्शवला असून नवीन पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे.