नवी दिल्ली, 25 डिसेंबर : देशातील टेलिकॉम कंपन्या आता दोन वर्षांपर्यंत तुमचा कॉल आणि ब्राउजिंग हिस्ट्री स्वत:कडे सुरक्षित ठेवू शकतात. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने सुरक्षा लक्षात घेता ग्राहकांचा कॉल डेटा आणि इंटरनेट ब्राउजिंग रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचा कालावधी एक वर्षाने वाढवून दोन वर्ष केला आहे.
21 डिसेंबर रोजी लायसन्समधील सुधारणा जारी करण्यात आल्या आणि 22 डिसेंबर रोजी दूरसंचार परमिटच्या इतर प्रकारांमध्ये वाढ करण्यात आली.
दूरसंचार विभागाच्या सर्कुलरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सर्व परवानाधारक नेटवर्कवर देवाण-घेवाण केलेले सर्व व्यावसायिक रेकॉर्ड, कॉल रेकॉर्ड, IP रेकॉर्ड संरक्षित केले जातील. सुरक्षेच्या कारणास्तव अशा नोंदी किमान दोन वर्ष रेकॉर्डसाठी ठेवल्या जातील. त्याशिवाय जर दोन वर्षांपर्यंत दूरसंचार विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त झाली नाही, तर दूरसंचार कंपन्या संग्रहित केलेला डेटा नष्ट करू शकतात.
नियमांमध्ये बदल करण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांना कॉल डेटा आणि इंटरनेट ब्राउजिंग रेकॉर्ड किमान एक वर्षासाठी संग्रहित करणं अनिवार्य होतं. या निर्णयाचा युजर्सवर थेट परिणाम होणार नाही. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे ऑनलाइन फ्रॉड सारख्या प्रकरणात तपास, चौकशी आणि प्रकरणं सोडवण्यास काही अंशी सोपं होणार आहे.
दरम्यान, एका आकडेवारीनुसार भारतात एकूण मोबाइल कनेक्शनची संख्या 180 कोटी आहे. त्यापैकी 70 कोटी कनेक्शनद्वारे इंटरनेट चालवलं जातं. देशात सध्या 60 कोटी स्मार्टफोन असून दर तीन महिन्यांनी ही संख्या 25 लाखांनी वाढत आहे. तसंच देशात सर्वाधिक डेटा भारतात वापरला जातो. देशात प्रत्येक व्यक्ती सरासरी 12 GB डेटाचा दर महिन्याला वापर करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news