Home /News /technology /

फोनवर बोलण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार; या कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत

फोनवर बोलण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार; या कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत

नव्या वर्षात तुमच्या खिशातील मोबाईलमुळेच तुमचा खिसा हलका होण्याची शक्यता आहे. कारण टेलिकॉम कंपन्या टॅरिफ वाढवण्याच्या तयारीत आहे.

    23 नोव्हेंबर, मुंबई: नवीन वर्षाच्या सुरूवातीला, आपल्याला फोन बिलावर 20 ते 25 टक्के अधिक खर्च करावा लागू शकतो. भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) सारख्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या आता त्यांच्या सेवांसाठी पुन्हा एकदा शुल्कात वाढ करू शकतात. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी शुल्क वाढवले होते. या खासगी क्षेत्रातील टेलिकॉम कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉईस आणि डेटा सेवा सर्व्हिसेस देत सध्याच्या दरांत उद्योगात टिकणं अवघड आहे. हेच कारण आहे की या कंपन्यांचे प्रतिनिधी टेलिकॉम रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) सोबत बोलणीदेखील करत आहेत. डिसेंबरपासून वाढू शकतात दर या वर्षाच्या अखेरीस भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या दरांत वाढ करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांनी दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता या व्हीआय कंपनीने ट्रायला विनंती केली आहे की, टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा व्हावी म्हणून व्हॉईस आणि डेटा सेवांचे दर वाढवावेत. अलीकडेच व्हीआय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठक्कर (Ravinder Takkar) म्हणाले की टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉईस आणि डेटा सेवेच्या दरांत वाढ करण्यास टाळाटाळ करायला नको. ते म्हणाले की, व्हीआय (Vi) येत्या काही दिवसांत पहिल्या दरवाढीची घोषणा करू शकते. एअरटेलही वाढवणार दर? रविवारी भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) म्हणाले की, मोबाईल सेवेचे दर सध्या लॉजिकल नाहीत. सध्याच्या दराने बाजारात राहणे अवघड आहे, म्हणून दरात वाढ करणे आवश्यक आहे. या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजारपेठेतील परिस्थितीचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ते म्हणाले होते की 160 रुपयांना एका महिन्यासाठी 16 जीबी डेटा देणे ही ट्रॅजिडी आहे. ते म्हणाले की टिकाऊ व्यवसायासाठी प्रतिग्राहक सरासरी महसूल आधी 200 रुपयांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि हळूहळू नंतर ते 300 रुपयांपर्यंत पोहोचला पाहिजे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Technology

    पुढील बातम्या