वॉशिंग्टन, 18 जानेवारी : कोरोनाचं (coronavirus) निदान करण्यासाठी कोरोना टेस्ट (corona test) करावी लागते. तर काही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच दिसत नाहीत, त्यामुळे ते कोरोना टेस्टही करून घेत नाहीत. पण आता कोरोना टेस्ट न करता तुम्ही सुरुवातीलाच आपल्याला कोरोना आहे की नाही, याचं निदान करू शकता. तुमचं स्मार्टवॉच (Smartwatch) तुम्हाला कोरोना आहे की नाही हे सांगू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
अॅपल वॉचसारखी स्मार्टवॉचेस, गार्मिन आणि फिटबिटसारख्या कंपन्यांनी बनविलेली फिटनेस ट्रॅकर्स उपकरणं लक्षणं न दिसणाऱ्या कोविड बाधित रुग्णांचं निदान करू शकतो. असा दावा न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हेल्थ सिस्टम, कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठ अशा विविध संस्थांनी केलेल्या संशोधनात केला आहे.
या अभ्यासानुसार, फिटबिट, गार्मीन आणि अॅपल वॉचसारखी हेल्थ ट्रॅकर्स हृदयाच्या ठोक्यांमधील बदल ओळखू शकतात. आपल्या शरीरात काहीतरी चुकीचं घडलं आहे हे शोधण्यासाठीचं हे मान्यताप्राप्त परिमाण आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हृदयाच्या ठोक्यांमधील बदल मोजण्याचं हे परिमाण म्हणजे हृदयाच्या दोन ठोक्यांमधील वेळ मोजला जातो. आपली तब्येत ठीक असेल आणि शरीराला कोणत्याही संसर्गाचा त्रास होत नसेल तर ज्या परिस्थितीत आहात त्यानुसार आपल्या हृदयाचा वेग बदलणं सर्वसामान्य आहे. उदाहरणार्थ, तणाव, निवांत, कोणताही ताण नसलेली स्थिती आणि त्या त्या वेळची परिस्थिती यावर आपली मज्जासंस्था ज्याप्रमाणे प्रतिसाद देते त्यानुसार हृदयाची गती बदलू शकते. पण आपल्या शरीराला कोणताही संसर्ग झाला असल्यास आणि इन्फ्लेमेशन, सूज असल्यास मज्जासंस्था मंद गतीनं प्रतिक्रिया देते, ज्यामुळे हृदयाची गती कमी होते.
हे वाचा - मुंबईकरांसाठी खूशखबर! उद्यापासून दिली जाणार कोरोना लस
संशोधक रॉब हिर्टन यांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "अद्याप आपण आजारी आहोत किंवा नाही असं लोक सांगतात, त्यावर आपली निदान पद्धती अवलंबून आहे. अॅपल वॉच परिधान केल्यास अशा कोणत्याही माहितीची आवश्यकता नसते. कारण हृदयातील ठोक्यांची गती युजरच्या तब्येतीची माहिती देत असतं. त्यामुळे लक्षणं न दिसणाऱ्या पण संसर्ग झालेल्या रुग्णांना ओळखणं सहज शक्य आहे. संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. आपल्याला माहित आहेच की, शरीरात इन्फ्लेमेशन असेल तर तर हृदयाच्या ठोक्यांचा वेगही बदलतो. कोविड हा असाच दाह निर्माण करणारा आजार आहे. त्यामुळं लोकांना त्यांना कोविडची बाधा झालेली आहे, हे कळण्यापूर्वी आपल्याला त्याबाबत ठाम निदान करणं शक्य होतं"
संशोधक मायकेल स्नायडर म्हणाले की, "संसर्ग शोधण्याच्या बाबतीत ट्रॅकर्स आणि स्मार्टवॉच वापरण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे ही उपकरणं सतत आपल्या शरीरातील बदल नोंदवू शकतात. त्यामुळे फक्त कोविड 19 नव्हे, तर इतर कोणत्याही रोगाचा शोध घेण्यात याची मदत होऊ शकते. सध्या कोविड 19 संसर्गाची चाचणी किमान 24 तास घेऊ शकते त्यामुळे ही चाचणी काही दिवसांतून एकदाच केली जाऊ शकते. परिणामी कोविड 19 चे संक्रमण लवकर शोधण्याची क्षमता कमी होते; पण फिटनेस ट्रॅकर्स आणि स्मार्टवॉचेस या त्रुटीवर मात करू शकतात"
हे वाचा - 'कोरोना लस घेतल्यानंतर मला...', AIIMS च्या संचालकांनी मांडला आपला अनुभव
अॅपल वॉच, गार्मिन, फिटबिट किंवा अशा उपकरणाच्या कोणत्याही उत्पादक कंपनीनं हे संशोधन प्रायोजित केलेलं नाही, असंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. आता यापुढं कोणतीही ट्रॅकर्स हृदयाच्या ठोक्यांमधील विसंगतींच्या आधारे डॉक्टरांना भेट देण्याची सूचना देऊ शकतात का, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. अनेकदा हृदयविकाराचा झटक्याची पूर्वसूचना देण्यात अॅपल वॉच यशस्वी ठरलं असून, त्यामुळं लोकांचे प्राण वाचले आहेत. अलिकडच्या काळातले हे संशोधन स्मार्टवॉच आणि ट्रॅकर्सची उपयुक्तता अधोरेखित करण्यात महत्त्वाचं ठरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Technology