मुंबई, 11 एप्रिल : प्रत्येकासाठी स्मार्टफोन (Smartphone) हा रोजची गरजेची वस्तू बनला आहे. स्मार्टफोनचा वापर संवाद साधण्याव्यतिरिक्त बऱ्याच कारणांसाठी केला जातो. एखाद्या गोष्टीचे जसे फायदे असतात, तसेच तोटेदेखील असतात. याला स्मार्टफोनदेखील अपवाद नाही. स्मार्टफोनचा स्फोट (Blast) झाल्याच्या घटना वारंवार ऐकायला मिळत आहेत. वनप्लस (Oneplus) आणि रिअलमी (Realme) या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा स्फोट झाल्याच्या घटना तर अगदी अलीकडच्या आहेत. खरं तर अशी घटना कोणाही व्यक्तीच्या बाबतीत घडू शकते. परंतु, काही ट्रिक्सचा वापर करून तुम्ही स्मार्टफोनचा स्फोट टाळू शकता.
स्मार्टफोनचा स्फोट होण्यामागे अनेक कारणं असू शकतात; मात्र अशा घटना प्रसंगी जिवावरही बेतू शकतात. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या फोनचा प्रोसेसर (Processor) हे फोन प्रमाणापेक्षा अधिक गरम होण्याचं एक मोठं कारण आहे. त्यामुळे तुमच्या फोनवर लोड येणारी अॅप्स (Apps) एकाच वेळी वापरणं टाळा. तसंच फोन चार्ज करताना त्याचा वापर करू नका. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही फोनच्या प्रोसेसरवरचा लोड कमी करू शकता.
हे वाचा - दिवसभर AC वापरूनही वाढणार नाही विजेचं बिल, जाणून घ्या 'या' खास टीप्स
अनेकदा फोन हातातून निसटून खाली पडतो. पडल्यामुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते. बॅटरी (Battery) खराब झाली की ती फुगते आणि त्यामुळे ती जास्त गरम झाल्याने फोनचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. तुमचा फोन उंचावरून पडला किंवा जोरात आपटला गेला तर तो ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावा.
काही जणांना फोन रात्रभर चार्जिंगसाठी (Charging) लावण्याची सवय असते; मात्र असं कदापि करू नये. कारण असं केल्यास फोन लवकर गरम होतो. तसंच बॅटरी अतिरिक्त गरम होणं, प्रमाणापेक्षा जास्त चार्जिंग होणं, शॉर्ट सर्किट होणं किंवा प्रसंगी फोनचा स्फोट असे प्रकार घडू शकतात.
फोनचा स्फोट होण्याचं एक मोठं कारण चार्जर (Charger) हेदेखील ठरू शकतं. त्यामुळे स्मार्टफोन नेहमी संबंधित कंपनीच्या चार्जरनेच चार्ज करावा. तुमचा चार्जर बिघडला किंवा खराब झाला तर ब्रॅंडेड चार्जर खरेदी करावा. थर्ड पार्टी चार्जरमुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते आणि त्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होऊ शकतो.
हे वाचा - घरात विजेचा शॉक लागण्यापासून होईल बचाव, या गोष्टी लक्षात ठेवाच
तसंच स्मार्टफोन जास्त वेळ थेट सूर्यप्रकाशात (Sunlight) ठेवणं टाळावं. दिवसा कारमध्ये फोन ठेवू नका, असा सल्ला नेहमी दिला जातो. अति उष्णतेमुळे फोनच्या बॅटरीतल्या सेलवर परिणाम होतो आणि त्यात ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइडसारखे वायू तयार होतात. या वायूंमुळे बॅटरी फुगते आणि तिचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे थेट सूर्यप्रकाशात स्मार्टफोन कदापि ठेवू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile, Mobile Phone, Smartphone, Technology