नवी दिल्ली, 9 डिसेंबर : UPI ने भारतात डिजिटल पेमेंट वाढवण्यास मोठी मदत केली आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनने डिजिटल पेमेंट अनेक गावांपर्यंत पोहोचलं आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या सतत वाढत असली, तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोक फीचर फोनचा वापर करतात. जे लोक स्मार्टफोन न वापरता साधा फीचर फोन वापरतात अशा लोकांनाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया UPI सुविधा देण्याचा विचार करत आहे.
डिसेंबरमध्ये नुकत्याच झालेल्या चलनविषयक चौथ्या द्विमासिक बैठकीत RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की फीचर फोनमध्ये UPI बेस्ड पेमेंट सिस्टम देण्याबाबत काम सुरू आहे. यामुळे डिजिटल पेमेंट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. रिझर्व्ह बँकने या पेमेंट सिस्टमचं ट्रायल केलं आहे. त्यामुळे लवकरच फीचर फोन अर्थात ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे युजर्सदेखील UPI Payment करू शकतील.
2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर भारतात डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाली. त्यानंतर कोरोना काळात यात बरीच वाढ झाली. डिजिटल पेमेंटचा ग्राफ सतत वाढताच आहे.
एका रिपोर्टनुसार, Google Pay, Paytm, PhonePe आणि BHIM App सारख्या इतर UPI प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला जवळपास 1.22 बिलियन म्हणजेच जवळपास 122 कोटीपर्यंत व्यवहार झाले. 2016 सालच्या म्हणजेच आतापासून पाच वर्षाच्या आधीची तुलना केल्यास यात 550 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये 1004 कोटींचं ट्रान्झेक्शन झालं आहे.
हा आकडा 2020-21 मध्ये 5,554 कोटींवर पोहोचला. 2021 च्या एप्रिल-मे महिन्यात डिजिटल ट्रान्झेक्शन 2020 च्या तुलनेत 100 टक्के वाढला आहे.
काय आहे UPI?
यूपीआय अर्थात यूनिफाइड पेमेंट इंटरफेस एक डिजिटल पेमेंटचा पर्याय आहे, जो मोबाइल App द्वारे काम करतो. या App द्वारे सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकता. पैसे अडकले तरी बँक खात्यात रिफंड होतं. यासाठी मोबाइलमध्ये App डाउनलोड करावं लागेल तसंच मोबाइल नंबर खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online payments, Rbi, Smartphone, Tech news, Upi