नवी दिल्ली, 13 जानेवारी : लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना मोबाईल गेम्सने वेड लावलेलं आहे. पबजी गेम (PUBG) जगभरासह भारतातही प्रचंड लोकप्रिय झाला होता. मात्र अतिशय धोकादायक असलेला हा गेम अनेकांचे जीव जाण्यासही कारणीभूत ठरला होता. त्यामुळे आणि चीनसोबत सीमेवर झालेल्या वादानंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतात सप्टेंबरमध्ये या गेमवर बंदी घालण्यात आली. जगभरातील अनेक देशांनीही या धोकादायक गेमवर बंदी घातली आहे. आता हा गेम पुन्हा नव्या रुपात दाखल करण्यात आला असून, यामुळे पबजी प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र भारतातील पबजी प्रेमींना यापासून वंचित रहावं लागणार आहे, कारण अद्याप भारतात या गेमवरील बंदी उठवण्यात आलेली नाही.
पबजी कार्पोरेशनने पबजी मोबाईल लाईट (PUBG Mobile Lite) या नावानं या गेमचं ग्लोबल व्हर्जन दाखल केलं आहे. यात अनेक बदल करण्यात आले असून, युनिव्हर्सल मार्क, विंटर कॅसल अशा नवीन फीचर्सचा यात समावेश आहे. हा गेम डाऊनलोड करण्यासाठी एपीके (APK) फाईलची साईज 575 एमबी आहे. हा गेम डाउनलोड करण्यासाठी -
- प्लेयर्सना पबजी मोबाईल लाईट वेबसाईटवर जाऊन एपीके फाईल डाउनलोड करावी लागेल.
- त्यानंतर इन्स्टॉल फ्रॉम अननोन सोर्सेसवर क्लिक करून तो ऑप्शन मोबाईलवर एनेबल करावा लागेल.
- त्यानंतर एपीके इन्स्टॉल करावा लागेल.
- ते झाल्यानंतर हा गेम खेळता येईल.
टॅपटॅपद्वारेही (TapTap) हा गेम डाउनलोड करता येईल पण त्यासाठी -
- आधी अधिकृत वेबसाईटवरून टॅपटॅप डाउनलोड करावे लागेल,
- त्यानंतर पबजी लाईट सर्च करून सिलेक्ट करून डाउनलोड करावा लागेल.
भारतीय बाजारात पबजी मोबाईलचं स्पेशल व्हर्जन दाखल होणार असून, पबजी कार्पोरेशनची मूळ कंपनी क्राफ्टन आयएनसीने भारतीय गेमिंग इंडस्ट्रीमध्ये 10 कोटी डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. पबजीने चिनी कंपनी टेन्सेंट गेम्ससोबतचा करार तोडला आहे. पबजी मोबाईल इंडियाला खास भारताच्या दृष्टीकोनातून बनवण्यात आलं असून तो लवकरच दाखल केला जाईल असं कंपनीनं जाहीर केलं असलं, तरी अद्याप तारीख नक्की करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय पबजीप्रेमींना अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे.