• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Netflix चं मोठं पाऊल; गेमिंग प्लॅटफॉर्म क्षेत्रात चाचपणी सुरू, या उद्योगातील दिग्गजांशी चर्चा

Netflix चं मोठं पाऊल; गेमिंग प्लॅटफॉर्म क्षेत्रात चाचपणी सुरू, या उद्योगातील दिग्गजांशी चर्चा

अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्स अजून एक मोठे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. यामुळे प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर आता नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

  • Share this:
नवी दिल्ली, 24 मे: नेटफ्लिक्स (Netflix) हा प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असलेला ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) आहे. दर्जेदार चित्रपट, वेब सीरिज आदी कंटेंटला प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. तसंच या कंटेंटची चर्चा देखील होते. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सारख्या निर्बंधांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अडचणीचं ठरत असल्याने तसंच चित्रपटगृह बंद असल्याने नागरिक या फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मनोरंजनावर भर देताना दिसत आहे. परिणामी नेटफ्लिक्सच्या प्रेक्षक संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येतं. अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्स अजून एक मोठे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स आता गेमिंग फ्लॅटफॉर्म (Gaming Platform) सुरू करण्याच्या तयारीत असून, त्याबाबत कंपनीने चाचपणी सुरु केली आहे. यामुळे प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर आता नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतो. एका अहवालानुसार, नेटफ्लिक्स आता गेमिंग प्लॅटफॉर्मवर उतरण्याच्या विचारात आहे. द इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, नेटफ्लिक्स आता गेमिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्याच्या विचारात असून, या प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी कंपनी तज्ज्ञ व्यक्तींच्या शोधात आहे. तसंच गेमिंग उद्योगातील अनेक दिग्गज व्यक्तींशी याबाबत बोलणं देखील सुरू आहे. नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून गेम्स उपलब्ध करुन देण्याच्या विचारात असल्याचं या अहवालात सूचित करण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यानं पॉलिगॉनशी बोलताना सांगितलं, की परस्पर आधारित करमणुकीबाबत (Interactive Programming) आम्ही काम करण्यास अधिक उत्सुक आहोत. आमचे सदस्य वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार कंटेंटला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागणीनुसार आमच्या सेवेत सातत्यानं विस्तार करत असल्याचं नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याच्या माहितीचा हवाला देत पॉलिगॉनने (Polygon) सांगितलं.

(वाचा - Google चं भन्नाट फीचर, तुम्ही सर्च केलेली माहिती खरी की खोटी? गुगल देणार डिटेल्स)

नेटफ्लिक्सने यापूर्वी ब्लॅक मिरर:बॅन्डरस्नॅच आणि यू वर्सेस वाईल्ड सारख्या सिनेमांच्या माध्यमातून परस्पर प्रोग्रामिंगचा प्रयोग केला होता. यामुळे प्रेक्षकांना या सिनेमातील पात्रांच्या हालचाली ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळालं होतं. तसंच नेटफ्लिक्सने स्ट्रेन्जर थिंग्ज आणि ला कासा डी पॅपल (मनी हेस्ट) या शोवर आधारित गेम्सही तयार केले होते. गेमिंग प्लॅटफॉर्मच्या विस्ताराबाबतचं वृत्त अद्याप अपुरे आहे. मात्र परस्पर मनोरंजनात अधिक रस असल्याने नेटफ्लिक्स गेमिंग विश्वात पाऊल ठेऊ शकतं, असं दिसतं. यापूर्वी शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने अ‍ॅपलच्या अ‍ॅपल आर्केडच्या (Apple Arcade) माध्यमातून ऑनलाइन सबस्क्रिप्शन ऑफरवर गेम्स उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा केली आहे. परंतु गेमिंगमध्ये जाहिरातींचा समावेश करता येत नाही, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
Published by:Karishma Bhurke
First published: