नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : प्रसिद्ध टीव्ही शो KBC च्या नावे लाखो रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. बिहारमध्ये हे प्रकरण उघडकीस आलं आहे. अडीच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. केबीसीच्या नावाने सायबर क्रिमिनल्सकडून ही फसवणूक करण्यात आली.
नवीन कुमार या व्यक्तीला 25 लाखांची लॉटरी लागल्याचं सांगण्यात आलं. लॉटरी लागल्याचं सांगत त्यांची वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये अडीच लाखांची फसवणूक झाली.
फ्रॉडस्टरने या व्यक्तीला कर्ज देण्याच्या नावाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलं. त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये त्या व्यक्तीच्या नावाने अकाउंट ओपन केलं. त्यानंतर पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्ड आपल्याजवळच ठेवलं. यादरम्यान फ्रॉडस्टर सतत नवीन कुमार यांना कर्ज देणार असल्याचं आश्वासन देत होता.
कर्ज देणार असल्याचं सांगत काही हप्त्यांमध्ये त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात येत होती. अशाप्रकारे फ्रॉडस्टरकडून अडीच लाखांची फसवणूक करण्यात आली.
काही दिवसांनी अचानक बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरने तुमच्या खात्यातील 36 लाखांची रक्कम वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये काढली असल्याचं सांगितलं. या अकाउंटबाबत त्यांना कोणतीच कल्पना नव्हती.
ज्यावेळी खोट्या खात्याचा तपास करण्यात आला, त्यावेळी 36 लाख रुपयांची ठेव आणि पैसे काढल्याची खात्री झाली. नवीन कुमार यांच्या नावे उघडण्यात आलेलं खोटं अकाउंट त्वरित ब्लॉक करण्यात आलं आहे. 36 लाख रुपये खात्यात कसे आले याचा शोध घेतला जात आहे.
फ्रॉडस्टरने नवीन कुमार यांच्या नावे जे अकाउंट ओपन केलं त्यात इतके पैसे होते. त्यांच्या नावे अशाप्रकारे बनावट अकाउंट तयार केलं असल्याचं त्यांना माहितही नव्हतं. परंतु फ्रॉडस्टरने त्यांच्या आधार-पॅनचा वापर करत अकाउंट ओपन करुन त्यात इतकी मोठी रक्कम जमा केली आणि काढली. आणि दुसरीकडे फ्रॉडस्टरने फोनपेच्या माध्यमातून अडीच लाख वेगळे घेतले. त्यांची फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीने अजून कोणाची फसवणूक केली आहे, याचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud