मुंबई, 11 ऑक्टोबर: अत्याधुनिक फीचर्स आणि उच्च दर्जाच्या सिक्युरिटी फीचर्समुळे अॅपलच्या फोनचे जगभरात चाहते आहेत. एखाद्या व्यक्तीकडे आयफोन असणं हे स्टेटस सिम्बॉल समजलं जातं. कारण, आयफोनच्या किंमती साधारण फोनपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहेत. नुकताच कंपनीनं iPhone 14 लाँच केला आहे. या फोनला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आता कंपनीनं iPhone 15च्या लाँचची तयारी केली आहे. या फोनशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. असं म्हटलं जात आहे, की पुढील वर्षी लाँच होणाऱ्या आयफोनच्या या मॉडेलमध्ये चार्जिंग पोर्टबाबत मोठे बदल होऊ शकतात. ब्लूमबर्ग मार्क गुरमनच्या रिपोर्टनुसार, 2023 मध्ये अॅपल iPhone 15च्या चार्जिंग पोर्टमध्ये बदल करणार आहे. त्यामुळे कोणत्याही सी टाईप स्मार्टफोन चार्जरच्या मदतीनं हा फोन चार्ज करता येणार आहे
चार्जिंग सपोर्टचा विचार केला तर अँड्रॉईड स्मार्टफोन्स जास्त दमदार समजले जातात. आता बहुतेक स्मार्टफोन्स यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टसह येतात, त्यामुळे घरातून बाहेर पडताना प्रत्येकवेळी चार्जर सोबत ठेवण्याची गरज पडत नाही. कारण, कोणत्याही स्मार्टफोनचा चार्जर वापरून तुम्ही तुमचा फोन सहज चार्ज करू शकता. आयफोन युजर्सच्या बाबतीत मात्र, असं होत नाही. त्यांना आपल्या आयफोनचं चार्जर सोबत ठेवावाच लागतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन अॅपल कंपनीनं iPhone 15च्या चार्जिंग पोर्टमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. पॉवर ऑन न्यूज लेटरच्या लेटेस्ट एडिशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनी iPhone 15 मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट बसवू शकते.
हेही वाचा:Whatsappवर Online असाल तरीही कुणाला कळणार नाही, वापरा ही सिक्रेट ट्रिक
आयफोन आणि इअरपॉड्समध्ये चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी लायटनिंग पोर्ट असतात. अशा प्रकारचे पोर्ट इतर स्मार्टफोन्समध्ये नसतात. त्यामुळे आयफोन युजर्सना नेहमी आपल्यासोबत चार्जर ठेवावा लागतो. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी iPhone 15मध्ये कंपनी प्रथमच लायटनिंग पोर्टच्या जागी टाइप-सी चार्जिंग पोर्ट ऑफर करू शकते.
दरम्यान, कंपनीनं आपल्या मॅकबुक आणि आयपॅड प्रोसारख्या काही उपकरणांमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंगवर पोर्ट देण्यास सुरुवात केली आहे. आयपॅड मात्र, अद्याप लायटनिंग पोर्टवर चालत आहेत. या वर्षाअखेरीस ते यूएसबी-सी पोर्टमध्ये अपग्रेड होण्याची शक्यता आहे.
असं झाल्यास फक्त इअरपॉड्स मॅजिक की-बोर्ड, मॅजिक ट्रॅकपॅड, मॅजिक माऊस यांसारखी अॅपल उत्पादनं लायटनिंग पोर्टसह मिळतील. एवढंच नाही तर येत्या काही वर्षांत अॅपल आपल्या आयफोन आणि आयपॅडसारख्या मॉडेल्समध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्टही देऊ शकतं. याची सुरुवात अॅपल वॉचपासून झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone, Smartphone