नवी दिल्ली, 25 मार्च : एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल, तर बहुतेकजण लगेच गुगलकडे (Google) वळतात. अगदी लहान मुलांनादेखील हे माहित झालं आहे. ती सुद्धा अभ्यास करताना एखाद्या शब्दाचा अर्थ अडला, गणिताचं सूत्र आठवत नसेल, एखादं कोडं सुटत नसेल तर सरळ गुगल सर्च (Google Search) करतात. आता तर गुगल गणित (Maths) अगदी त्यातील पायऱ्यासह सोडवून देणार आहे. आतापर्यंत गणित सोडवण्यासाठी गुगल मदत करत होतेच, पण ते म्हणजे गणिताचं थेट उत्तर सांगितलं जात असे. आपल्या उत्तराबरोबर ते पडताळून बघून आपलं चूक की बरोबर हे तपासता येत होतं. आता मात्र गुगलने खास गणितासाठी एक इंटर अॅक्टिव्ह फीचर (Interactive Feature) आणलं आहे. गणित शिकण्यासाठी याचा चांगला फायदा होणार आहे.
गुगलने याबाबत ब्लॉगवर (Google Blog) दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये सर्चचे दोन नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. एक आहे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स (Practice Problems). यामुळे फिजिक्स, गणित आणि केमिस्ट्रीमधील तुमचं ज्ञान तुम्हाला तपासता येणार आहे. हे इंटर अॅक्टिव्ह फीचर असून, हायस्कूल मॅथ्स, केमिस्ट्री आणि फिजिक्समधील टॉपिक्स सर्चमध्ये जाऊन बघता येणार आहेत.
बीबीसी बाईटसाईझ BBC Bitesize, बायज्यूज Byjus, करिअर्स 360 Careers360, चेग Chegg, सीके 12 CK12, एज्युकेशन क्विझेस Education Quizzes, ग्रेड अप GradeUp, ग्रेट माईंडस Great Minds, काहूट! Kahoot!, ओपनस्टॅक्स OpenStax, टॉपर Toppr, वेदांतु Vedantu आदी अनेक ऑनलाइन मागर्दर्शन करणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही केवळ एका क्लिकवर माहिती घेऊ शकता, असंही या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही केमिकल बॉंड प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स असं गुगल सर्चवर टाईप केलं तर तुम्हाला अनेक ऑनलाइन गायडन्स प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होतील. तुम्ही तुमचं उत्तर सबमिट केलं की तत्काळ तुम्हाला तुमचं उत्तर चूक की बरोबर हे कळवलं जाईल.
तर दुसरं फिचर आहे एक्सप्लेनर फीचर (Explainer Feature). हे तुम्हाला फक्त गणिताचं उत्तर सांगणार नाही, तर ते कसं आलं हे देखील सांगणार आहे. सुमारे सत्तर भाषांमध्ये गणितातील उदाहरणं त्यातील पायऱ्यांसह सोडवून दाखवली जातील. यासाठी तुम्हाला सर्च बटणवर संपूर्ण गणित टाईप करावं लागेल किंवा तुम्ही गुगल लेन्सचा (Google Lens) वापर करून त्याद्वारे तुमच्या वहीतील किंवा पुस्तकातील गणित दाखवू शकता. त्यानंतर गुगल ते गणित सोडवण्यातील सगळ्या पायऱ्या दाखवत त्याचे बरोबर उत्तर स्पष्ट करेल.
एवढंच नव्हे, तर तुमचं गणिताचं आकलन वाढावं, हा विषय समजून घेता यावा यासाठी काही अन्य साधनंही गुगलनं आणली आहेत. परीक्षेच्या आधी तुम्हाला एखादं विशिष्ट गणित येत नसेल, तर लगेच गुगल करा तुम्हाला ते समजून घेता येईल. अवघड विषयांमधील कठीण प्रश्नही गुगलच्या या फीचर्सच्या सहाय्याने चुटकीसरशी सोडवता येतील. विषय सोपे करून समजून घेण्यासाठी ही फीचर्स महत्त्वाची ठरणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google