नवी दिल्ली, 23 एप्रिल : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric scooters) लागलेल्या आगीच्या घटनांबाबत कठोर पाऊलं उचलली आहेत. या घटनांच्या चौकशीसाठी त्यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर वाहनांच्या गुणवत्तेबाबत- क्वालिटीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील आणि निष्काळजी कंपन्यांना मोठा दंड आकारला जाईल.
चौकशीत कोणत्याही कंपनीचा निष्काळजीपणा आढळून आल्यास त्या कंपन्यांना मोठा दंड ठोठावण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले. यासोबतच मार्केटमधून सर्व खराब वाहनं परत मागवण्याचे आदेश दिले जातील. समितीचा अहवाल येईपर्यंत कंपन्या स्वत:हून बाजारात गेलेली सर्व खराब वाहनं परत मागवण्याची कारवाई करू शकतात.
नितीन गडकरींनी गुरुवारी ट्विट करत सांगितलं, की मागील दोन महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरबाबत अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये काही जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमीही झाले आहेत ही बाब अतिशय दु:खद आहे. आम्ही या घटनांबाबत चौकशी करण्यासाठी एक एक्सपर्ट कमिटी तयार केली आहे. ही कमिटी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपायही सांगेल. कमिटीच्या रिपोर्ट्सच्या आधारे आम्ही अशा समस्या निर्माण झालेल्या कंपन्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं, नितीन गडकरी म्हणाले.
इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 26 मार्च रोजी आगीची पहिली घटना घडली. पुण्यात Ola s1 pro इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागली होती. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर 26 मार्च रोजी पुन्हा संध्याकाळी तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागली होती. त्यानंतर दोन दिवसांनी 30 मार्च रोजी चेन्नईत Pure EV च्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागली. नाशिकमध्ये 11 एप्रिल रोजी ट्रकमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सला आग लागली होती.
मागील आठवड्यात ओकिनावाने आपल्या प्रेज प्रो मॉडेलचे 3215 यूनिट्स परत मागवले होते. या घटनेच्या चौकशीसाठी सरकारने 28 मार्च रोजी एक्सपर्टची एक टीम नियुक्त केली आहे. टीमने ओला इलेक्ट्रिक आणि ओकिनावा स्कूटरच्या टेक टीमकडून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.