मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Meta कंपनी अडचणीत येण्याची शक्यता, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची विक्रीही करावी लागू शकते

Meta कंपनी अडचणीत येण्याची शक्यता, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची विक्रीही करावी लागू शकते

Meta च्या ट्रेनिंगबद्दल माहिती जाणून घेऊया.

Meta च्या ट्रेनिंगबद्दल माहिती जाणून घेऊया.

व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही मेटा कंपनीला अधिक महसूल मिळवून देणारी अॅप्स आहेत. असं असलं तरी भविष्यात या अॅप्सची कंपनीला विक्री करावी लागू शकते. कारण फेडरल ट्रेड कमिशननं या कंपनीच्या काही गोष्टींवर आक्षेप नोंदवला आहे.

मुंबई, 14 जानेवारी : मेटा (Meta) म्हणजेच पूर्वीच्या फेसबुक या कंपनीची व्हॉट्सअॅप (Whatsapp) आणि इन्स्टाग्राम (Instagram) ही सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्स (Social Media Apps) आहेत. जगभरात अब्जावधी युझर्स व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम वापरतात. परंतु, येत्या काळात मेटा कंपनी अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसंच या कंपनीला व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची विक्रीदेखील करावी लागू शकते, असं बोललं जात आहे. अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. मेटाची सोशल मीडिया क्षेत्रात मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना फार कमी पर्याय उपलब्ध होत आहेत. तसंच यामुळे प्रायव्हसी प्रोटेक्शन (Privacy Protection) कमी होत आहे, असा दावा फेडरल ट्रेड कमिशननं (Federal Trade Commission) केला आहे. याविषयीचं वृत्त `आज तक`ने प्रसिद्ध केलं आहे.

व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही मेटा कंपनीला अधिक महसूल मिळवून देणारी अॅप्स आहेत. असं असलं तरी भविष्यात या अॅप्सची कंपनीला विक्री करावी लागू शकते. कारण फेडरल ट्रेड कमिशननं या कंपनीच्या काही गोष्टींवर आक्षेप नोंदवला आहे. अँटी ट्रस्ट (Anti Trust) प्रकरणात मेटा कंपनीला हे कमिशन न्यायालयातही खेचू शकतं. या फेडरल ट्रेड कमिशनला फेडरल न्यायाधीशांकडून हिरवा झेंडा मिळालेला असून, मागील वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी लीना खान (Leena Khan) यांची या कमिशनवर नेमणूक केली आहे. सध्या या कमिशनचं नेतृत्व लीना खान करत आहेत.

33 वर्षांच्या लीना खान यांचं नाव अनेक वर्षांपासून अँटी ट्रस्ट प्रकरणांशी जोडलं गेलेलं आहे. येल लॉ स्कूलमध्ये असल्यापासून लीना खान अँटी ट्रस्ट आणि कॉम्पिटिशन कायद्याच्या कामांसाठी ओळखल्या जातात. मार्च 2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी लीना खान यांची फेडरल ट्रेड कमिशनवर नेमणूक केली. जून 2021 पासून लीना कार्यरत आहेत. तसंच त्या कोलंबिया लॉ स्कूलमध्ये सहयोगी प्राध्यापकदेखील आहेत.

2012 मध्ये फेडरल ट्रेड कमिशननं फेसबुकला 1 अब्ज डॉलरला इन्स्टाग्रामचं अधिग्रहण करण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यावेळी कंपनीत केवळ 13 कर्मचारी होते. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये फेसबुकनं व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप 19 अब्ज डॉलरला खरेदी केलं होतं. फेसबुक टप्प्याटप्प्यानं आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या विकत घेत असून, मक्तेदारी (Monopoly) अर्थात एकाधिकारशाही निर्माण करत आहे, असा युक्तिवाद `एफटीसी`नं केला आहे. कंपनीचा वाढता प्रभाव पाहता ग्राहकांना फार कमी पर्याय उपलब्ध होत आहेत. तसंच यामुळे मार्केटमध्ये नवं तंत्रज्ञान आणि व्यावसायिक संकल्पना येत नाहीत. यामुळे प्रायव्हसी प्रोटेक्शनही कमी होत असल्याचा आरोप कमिशननं केला आहे.

आपल्या कारकिर्दीत लीना खान यांनी अँटी ट्रस्ट कायद्याच्या माध्यमातून अमेरिकेतल्या अनेक मोठ्या कंपन्यांना आव्हान दिलं आहे. तथापि मेटानं आपला बचाव करण्यासाठी लीना खान यांच्या याच इमेजचा वापर केला आहे. लीना खान कंपन्यांबाबत पक्षपातीपणा करतात, असा दावा या कंपनीनं केला आहे. फेडरल न्यायाधीश जेम्स ई. बोसबर्ग यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मेटा कंपनीचा दावा फेटाळून लावला आहे.

गेल्या वर्षी ही एजन्सी मेटा अर्थात पूर्वीच्या फेसबुक कंपनीविरोधात न्यायालयात गेली होती. त्यावेळी कमी माहितीमुळे न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीस नकार दिला होता. आता `एफटीसी`नं आपल्या तक्रारीत बदल करून न्यायालयात धाव घेतली आहे. सोशल मीडिया क्षेत्रात मेटाची मक्तेदारी असल्याचा आरोप `एफटीसी`नं केला आहे. `एफटीसी`ची नजर केवळ मेटावरच नाही, तर अॅमेझॉन (Amazon) आणि गुगलवरही (Google) आहे.

First published:

Tags: Facebook, Instagram