नवी दिल्ली, 21 डिसेंबर : कॉर्पोरेट सेक्टर (Corporate Sector) सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे त्रस्त आहे. विविध कंपन्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सायबर हल्ल्यात (Cyber Attack) दररोज 250 कॉर्पोरेट कंपन्यांची अकाउंट्स हॅक होतात. त्यापैकी सुमारे 80 टक्के सायबर हल्ले हे पासवर्डच्या अनुषंगाने होतात. ही समस्या सोडवण्यासाठी आता आगामी काळात पासवर्डविरहित तंत्रज्ञान येणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने (Microsoft) या तंत्रज्ञानावर यापूर्वीच काम सुरू केले आहे.
मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) लॅपटाप आणि स्मार्टफोनची अनलॉक सिस्टम आता पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. याबाबत कंपनीने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या आपल्या ब्लॅागमध्ये सांगितलं की, पासवर्डविरहीत (Password Less) तंत्रज्ञानाकडे आमची वाटचाल सुरू असून, 2021 पर्यंत आम्ही हे उदिद्ष्ट साध्य करू. याचाच अर्थ सायबर हल्ले रोखण्यासाठी येता काळ हा पासवर्डविरहीत तंत्रज्ञानाचा असणार हे नक्की.
मायक्रोसॉफ्टने (Microsoft) ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, दररोज होणाऱ्या सायबर हल्ल्यांपैकी 80 टक्के सायबर हल्ले हे पासवर्डमुळे होतात. यामुळे दररोज सुमारे 250 कॉर्पोरेट कंपन्यांची अकाउंट हॅक केली जातात. यासाठी कंपनीने पासवर्ड फ्री किंवा पासवर्डविरहीत तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दरमहा सुमारे 100 दशलक्षांहून अधिक लोक हे मायक्रोसॉफ्टचे पासवर्डविरहीत साईन-इन तंत्रज्ञान वापरत असल्याचे, कंपनीने नोव्हेंबर 2019 मध्ये स्पष्ट केले होते. मे 2020 मधील जागतिक पासवर्ड दिनापर्यंत या संख्येत मोठी वाढ झाली होती. मे 2020 अखेर 150 दशलक्ष लोक मायक्रोसॉफ्टचे पासवर्डविरहीत तंत्रज्ञान वापरत होते. आता पासवर्डविरहीत बायोमेट्रीक पध्दतीचा वापरुन करुन आपले कामकाज करणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या संख्येचा अंदाज घेऊन येत्या 2021 मध्ये सर्व ग्राहकांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणार असल्याचे, कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले आहे.
ग्राहकांसाठी नवीन पर्याय आणि तंत्र म्हणून नवीन UX आणि API चा समावेश असलेल्या एफडीओ 2 (FDO2) सिक्योरिटी की विकसित करण्यात येणार आहेत. तसंच यासाठी 2021 मध्ये नोंदणी पोर्टल सुरु करण्याचं देखील नियोजन असल्याचे, कंपनीने म्हटले आहे. माय ॲप पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना पासवर्डविरहीत सुविधेचा लाभ घेता येईल. मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर आणि एफडीओ 2 च्या सुरक्षित कींचा वापर करुन अझूर अॅक्टिव्ह डिरेक्टरीचा (Azure Active Directory) वापर विडोंज हॅलो फॉर बिझनेस (Windows Hello For Business) आणि पासवर्डविरहीत फोन साईन-इनसाठी करण्याचं प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचलं आहे, असं कंपनीनी नमूद केलं आहे.
सुमारे 150 दशलक्ष पासवर्डविरहीत युझर्स अझूर अॅक्टिव्ह डिरेक्टरी आणि मायक्रोसॉफ्ट कन्झ्युमर अकाउंटसचा वापर करत आहेत. अनेक युझर्स विडोंज 10 असलेल्या डिव्हाईसेसमध्ये पासवर्डऐवजी विडोंज हॅलोचा वापर करत आहेत. गतवर्षी हे तंत्र वापरणाऱ्या युझर्सचे प्रमाण 69.4 टक्के होते, ते आता 84.7 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
पासवर्डविरहीत तंत्रज्ञानावर मायक्रोसॉफ्ट कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. कंपनीने हायब्रीड तंत्रासाठी (Hybrid) पूरक ठरणाऱ्या एफडीओ 2 सिक्योरिटी किजसाठी अझूर अॅक्टिव्ह डिरेक्टरी कशी सपोर्ट याचे पुनरावलोकन करण्यात येईल, अशी घोषणा कंपनीने गेल्या फेब्रुवारीत केली होती. एफडीओ 2 सिक्योरिटी किजचा वापर करुन अझूर अॅक्टिव्ह डिरेक्टरी विडोंज 10 असलेल्या डिव्हाईसवर युझर्सने साईन-इन केल्यास त्यांना अधिक सुरक्षा आणि क्लाऊड सुविधेचा लाभ मिळू शकतो.
नवे पासवर्डविरहीत तंत्र मायक्रोसॉफ्ट 365 च्या व्यवस्थापन सेंटर्समधून उपलब्ध करुन दिले जाईल, असे कंपनीने सप्टेंबरमध्ये आयोजित एका कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले. एफडीओ 2 हा मायक्रोसॉफ्टच्या पासवर्डविरहीत तंत्रज्ञानाचा महत्वाचा भाग असल्याचे यावेळी कंपनीने सांगितले.
या सुविधेवर मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल या कंपन्या काम करीत आहेत. आयफोन निर्मात्यांनी टच आयडी, अॅपल आयडी लॉग इन सिस्टीम, आयफोन्स, लॅपटॉप आणि मॅकबुकसाठी फेस आयडी तंत्रावर अधिक भर दिलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Password