लंडन, 28 जानेवारी : स्मार्टफोन (Smartphone) न वापरता एक दिवस राहून दाखवा, असं सध्याच्या काळात सांगितलं, तर बहुतांश जण ते अशक्य असल्याचं मान्य करतील. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण मोबाइलच्या आहारी गेल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. अलीकडच्या काळात सिगारेट, दारू, अमली पदार्थ यांच्या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठी उपचार केले जातात तसे मोबाइल (Mobile), सोशल मीडियाच्या (Social Media) व्यसनापासून सुटका होण्यासाठीही अनेक जण उपचार घेतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध ब्रिटिश गायक (British Singer) एड शीरन (Ed Sheeran) याचा मोबाइल फोन डीटॉक्सचा (Mobile Phone Detox) अनुभव अनेकांना स्तिमित करत आहे.
फोटोग्राफ, शेप ऑफ यू, बॅड हॅबिट्स अशी गाजलेली गाणी देणाऱ्या तीस वर्षांच्या या तरुण गायकानं गेल्या तब्बल पाच वर्षांपासून स्मार्टफोन वापरणं सोडून दिलं आहे. ऐकून धक्का बसला ना! पण हे सत्य आहे. 2015 मध्ये त्याची दहावी वर्ल्ड टूर (X World Tour) संपल्याक्षणी त्यानं मोबाइल वापरणं बंद केलं. त्यानं स्वतःच 'द कलेक्टर'च्या पॉडकास्टवर पोस्ट केलेल्या एका एपिसोडमध्ये आपला हा निर्णय, त्यामागची भूमिका आणि अनुभव शेअर केला.
त्याने सांगितलं, 'मोबाइल फोन आणि ई-मेल्सच्या (Emails) माध्यमातून चाहत्यांना प्रतिसाद देण्यातच माझा सगळा वेळ जात असे. त्यामुळे मला खूप त्रास होत असे. माझ्या मनावर दडपण वाढत असे आणि याचा परिणाम माझ्या मानसिक आरोग्यावर होऊ लागला होता. त्यामुळे मी अखेर एक निर्णय घेतला तो म्हणजे मोबाइल फोनपासून दूर जाण्याचा. फोन वापरायचा नाही, असा मी निर्धार केला.' हा आपला सगळ्यात चांगला निर्णय होता, असं त्यानं आवर्जून नमूद केलं.
हे वाचा - Instagram वरील फोटोमुळे अडकला विमा, पण कोर्टाने मिळवून दिले 17 कोटी रुपये!
आजच्या काळात चाहत्यांशी सतत संपर्क ठेवण्यासाठी सोशल मीडिया हे अगदी लोकप्रिय माध्यम असताना, या डिजिटल जगात असं मोबाइल फोनविना, सोशल मीडियाविना राहणं एक सेलेब्रिटी म्हणून धोक्याचं नाही का, या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, 'मी फोन वापरणं बंद केलं याचा अर्थ मी चाहत्यांशी संपर्क तोडला आहे, असं नाही. मी संपर्क फक्त मर्यादित केला आहे. आता मी ई-मेलच्या माध्यमातून चाहत्यांना प्रतिसाद देतो; मात्र त्याचं प्रमाणही निश्चित केलेलं आहे. ठराविक काही दिवसांनी, मी माझा लॅपटॉप उघडतो आणि एका वेळी फक्त 10 ई-मेल्सना उत्तर देतो. त्यामुळं माझ्या आयुष्यात आता सोशल मीडियाचं अतिक्रमण होत नाही. मी इतर अनेक गोष्टींना भरपूर वेळ देऊ शकतो, माझं आयुष्य भरभरून जगतो.'
'मोबाइल फोनची संगत सोडणं ही सर्वांत चांगली गोष्ट आहे. यामुळे आपोआपच विनाकारण निर्माण होणारे ताणतणाव दूर होतात. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत कोणत्याही अडथळ्याशिवाय मनसोक्त वेळ घालवता येतो,' असं एड शीरन यानं स्पष्ट केलं.
हे वाचा - काय? केसांचा एक विग बनवण्यासाठी नक्की किती लागतो वेळ? अशी असते किचकट प्रक्रिया
एड शीरनला स्वतःला नवनवीन फीचर्स असलेल्या स्मार्टफोनची अजिबात आवड नाही. अर्थात याचा अर्थ असा नाही, की त्याला स्मार्टफोन्स आवडत नाहीत. शीरन आजही त्याच्या जुन्या ब्लॅकबेरी बोल्ड (Black berry Bold Mobile) मोबाइल फोनसोबतच्या आठवणीत रमतो. आजकाल अतिप्रगत फोन तयार करणाऱ्या कंपन्यांनी साधे, सोपे फोन बनवावेत, असं त्याचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Mobile, Smartphone, Technology