Home /News /technology /

विमानाचं लँडिंग तीनवेळा अयशस्वी ठरताच रडू लागले प्रवासी, वैमानिकानं काय केलं नक्की वाचा

विमानाचं लँडिंग तीनवेळा अयशस्वी ठरताच रडू लागले प्रवासी, वैमानिकानं काय केलं नक्की वाचा

वैमानिकानं जवळपास तीन वेळा प्रयत्न करुनही हे विमान लँड करण्यात यश आलं नाही (Landing of Plane Fail Three Times). यानंतर तब्बल एक तास विमान हवेतच राहिल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

    अहमदाबाद 21 मार्च : अहमदाबादहून जैसलमेरला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाच्या प्रवाशांना एक भयंकर अनुभव आला. काही तांत्रिक अडचणींमुळे हे विमान जैसलमेरच्या विमानतळावर लँडिंग करू शकलं नाही. वैमानिकानं जवळपास तीन वेळा प्रयत्न करुनही हे विमान लँड करण्यात यश आलं नाही (Landing of Plane Fail Three Times). यानंतर तब्बल एक तास विमान हवेतच राहिल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. काही प्रवासी तर रडूच लागले. यानंतर विमान पुन्हा एकदा अहमदाबादकडे घेऊन जाण्यात आलं. याठिकाणी यशस्वी लँडिंग केल्यानंतर तब्बल दोन तासानंतर दुसऱ्या वैमानिकासह हे विमान जैसलमेरला पाठवण्यात आलं आणि अखेर या विमानाचं जैसलमेरमध्ये सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटचं एसजी 3012 या विमानानं अहमादबादहून शनिवारी12:05 च्या आसपास जैसलमेरसाठी उड्डाण केलं होतं. जवळपास एक वाजता हे विमान जैसलमेर विमानतळाजवळ आलं. वैमानिकानं या विमानाचं लँडिंग करण्यासाठी प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले. यानंतर पुन्हा दोन वेळा विमान आकाशात उडवून पुन्हा लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे विमानाचं लँडिंग शक्य झालं नाही. यादरम्यान तब्बल एक तास हे विमान हवेतच राहिलं. दोन वाजताच्या आसपास वैमानिक हे विमान पुन्हा अहमदाबादला घेऊन गेला. याठिकाणी 2:40 ला विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. यानंतर दोन तासांनी या विमानाचं पुन्हा जैसलमेरसाठी उड्डाण करण्यात आलं, अखेर पाच वाजून पंधरा मिनिटांनी हे विमान सुरक्षितरित्या जैसलमेरमध्ये लँड झालं. जैसलमेर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक बी.एस. मीणा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं, की काही तांत्रिक अडचणींमुळे अहमदाबादहून जैसलमेरला जाणाऱ्या विमानाचं वेळेत लँडिंग होऊ शकलं नाही. मात्र सायंकाळी सव्वा पाच वाजता सर्व प्रवाशांसह या विमानानं जैसलमेर विमानतळावर सुरक्षित लँडिंग केलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Travel by flight

    पुढील बातम्या