नवी दिल्ली, 17 जानेवारी : WhatsApp गेल्या काही दिवसांपासून नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादात आहे. व्हॉट्सअॅप सुरू ठेवण्यासाठी ही नवी पॉलिसी स्वीकरणं आवश्यक होतं. पॉलिसी न स्वीकारल्यास, अकाउंट डिलीट होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु अनेक आरोपांनंतर कंपनीने नवी पॉलिसी सध्या स्थगित केली असून कोणाचंही अकाउंट डिलीट होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण आता आणखी एक माहिती समोर आली आहे. WhatsApp Web द्वारे युजर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स गुगल सर्चवर उपलब्ध होत असल्याची माहिती समोर आली आहे. एका सिक्योरिटी रिसर्चरच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे.
सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी ट्विटरवर स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. त्यात युजर्सचे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत. कॉन्टॅक्ट नंबरसह मेसेजही गुगल सर्चमध्ये उपलब्ध असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. तसंच, या स्क्रिनशॉटसह त्यांनी, व्हॉट्सअॅप त्यांच्या वेबसाईट आणि गुगलला अद्यापही का मॉनिटर करत नाही, असा सवालही केला आहे.
राजशेखर राजहरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हॉट्सअॅप वेबद्वारे गुगलवर लीक होत आहेत. ज्यावेळी युजर्स लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सऍपचा QR कोडद्वारे वापर करतात, त्यावेळी गुगल याचं इंडेक्सिंग करतो. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व पर्सनल मोबाईल नंबर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
परंतु, यात थेट व्हॉट्सअॅपला दोषी ठरवलं जाऊ शकत नाही, यात गुगलचीही चूक दिसते असल्याचं ते म्हणाले. ज्यावेळी परवानगी नसते, त्यावेळी गुगलनेही युजर्सची पर्सनल माहिती इंडेक्स करू नये, असं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय व्हॉट्सअॅप जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असूनही आपल्या युजर्सच्या सेफ्टीसाठी आपल्या वेबसाईटची देखरेख करत नसून, यामुळे युजर्सचा पर्सनल डेटा धोक्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी रिसर्चरने, गुगल सर्चवर व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या पर्सनल इनवाईट लिंकही असल्याचं सांगितलं होतं. म्हणजे गुगलने याचंही इंडेक्सिंग केलं होतं. या लिंक्सद्वारे कोणीही, कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड होऊ शकतं आणि संपूर्ण कॉन्टॅक्ट्स अॅक्सेसही करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.