नवी दिल्ली, 1 डिसेंबर : कोविड-19 महामारीनंतर वाहन बाजारात तेजी आली आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांपासून वाचण्यासाठी अनेकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर टाळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, सध्या कार विक्रीमध्ये वाढ होताना दिसत आहे. वाढती मागणी पाहून वाहन निर्मिती कंपन्यांनीदेखील अॅडव्हान्स्ड आणि नवीन मॉडेल्सच्या गाड्या लाँच करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कार खरेदी करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकालाच नवी कोरी कार खरेदी करता येत नाही. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबं सेकंड हँड कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. पण, सेकंड हँड कार खेरदी केल्यानंतर तिच्या इन्शुरन्सकडे लक्ष दिलं जात नाही. सेकंड हँड कारचा इन्शुरन्स काढता येतो हेदेखील अनेकांना माहिती नाही. परिणामी, अपघात झाल्यास त्यांना स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात. कार नवीन असो किंवा सेकंड हँड तिचा इन्शुरन्स काढलाच पाहिजे, असा सल्ला जाणकार देतात. ‘झी बिझनेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
वैध थर्ड पार्टी लाएबिलिटी कार इन्शुरन्स कव्हरशिवाय कार चालवणं हा मोटर वाहन कायदा, 1988 नुसार गुन्हा आहे. या प्रकारचं विमा संरक्षण तुमच्यासोबत झालेल्या अपघातात सहभागी असलेल्या तृतीय पक्षाला नुकसानी भरपाई मिळवून देतं. अपघात झाल्यानंतर होणारा खर्च टाळण्यासाठी सेकंड हँड कारचादेखील विमा घेतला पाहिजे. कारण, तुमच्या कारमुळे झालेल्या अपघातात एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला नियामानुसार भरपाई द्यावी लागते. ती व्यक्ती जखमी झाली असेल तर आवश्यक वैद्यकीय खर्चदेखील द्यावा लागतो. हा सर्व खर्च कार विम्यामध्ये कव्हर होतो.
हेही वाचा - ‘या’ सेंटिंगद्वारे मुलांसाठी मोबाइल होईल सुरक्षित; मुलांना अयोग्य माहितीपासून दूर ठेवण्यासाठी होईल उपयोग
कार चोरीला गेल्यानंतर फार मोठं नुकसानं होतं. तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये योग्य विमा रक्कम सेट करून तुम्ही कार रिप्लेसमेंटसाठी पैशांची व्यवस्था करू शकता. या शिवाय, पूर, भूकंप, दरड कोसळणं आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळेही कारचं नुकसान होऊ शकतं. अशा घटनांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून सुरक्षा देण्याचं काम विमा करतो. दंगल, तोडफोड किंवा आग या सारख्या मानवनिर्मित आपत्तींमुळे नुकसान झाल्यावरदेखील विम्यामुळे आर्थिक सुरक्षा मिळते.
सेकंड हँड कार विमा खरेदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं
सेकंड हँड कार विमा खरेदी करण्यासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा सरकारने जारी केलेलं फोटो आयडी या पैकी एक ओळखीचा पुरावा आवश्यक असतो. रहिवासी पुराव्यासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुकपैकी एका कागदपत्राची गरज असते. या सोबतच नुकताच काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र आणि कार खरेदीचे अधिकृत बिल असणं आवश्यक आहे.
सेकंड हँड कार विमा हा नवीन कार विमा पॉलिसी प्रमाणेच आवश्यक डिडक्शनच्या अधीन असतो. आयआरडीएआय, तुमच्या कारच्या क्युबिक क्षमतेच्या आधारावर त्याची किंमत निश्चित करते. 1500 सीसीपर्यंत क्युबिक क्षमतेच्या कारसाठी एक हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक क्युबिक क्षमतेसाठी दोन हजार रुपये निश्चित केलेले आहेत. तुमच्या कार विमा कंपनीकडून आकारला जाणारा प्रीमिअम कमी करण्यासाठी तुम्ही ऐच्छिक डिडक्शनची निवड करू शकता. या शिवाय, तुम्हाला कारच्या पार्ट्स आणि अॅक्सेसरीजवरील डिप्रिसिएशन खर्चदेखील भरावा लागेल. आयआरडीएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याची गणना केली जाते. कार पेंटसाठी नायलॉन, प्लॅस्टिकचं भाग, रबर टायर आणि ट्युब, एअर बॅग आणि बॅटरीसाठी 50 टक्के डेप्रिसिएशन खर्च आकारला जातो. फायबरग्लाससाठी 30 टक्के डेप्रिसिएशन खर्च आकारला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.