नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : जगभरात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण फोन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या Apple ने नुकतीच नावीन्यपूर्ण फीचर्स असलेली iPhone 13 सीरिज लाँच केली. iPhone 13 सीरिजमधील विविध मॉडेल्स, त्यांचे फीचर्स, नवीन बदल याबाबत चर्चा सुरू असतानाच आता iPhone 14 ची देखील चर्चा सुरू झाली आहे. Apple कंपनी दरवर्षी नवीन, अधिक सुधारित आयफोन लाँच करते. यंदा कंपनीने iPhone 13 दाखल केला. त्यानंतर iPhone 14 येणार असल्याची चर्चा होतीच, त्यावरून विविध अंदाज बांधले जात होते. मात्र आता या फोनचे फीचर्स, तो कधी दाखल होणार इत्यादी गोपनीय माहितीदेखील सोशल मीडियावर खुली झाली आहे. त्यामुळे iPhone 14 बाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Apple ने iPhone 13 च्या श्रेणीअंतर्गत iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max हे स्मार्टफोन्स नुकतेच लाँच केले. यानंतर आता iPhone 14 ची चर्चा सुरू आहे. या फोनचे केवळ फीचर्सच नाही, तर मॉडेल्सच्या नावांचीही माहिती खुली झाली आहे.
iPhone 14 च्या फीचर्सबद्दल आधीही बरेच अंदाज लावले गेले आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 14 चं डिझाइन नेहमीपेक्षा पूर्णपणे वेगळं असेल. iPhone 14 च्या श्रेणीत iPhone 14 Mini हे मॉडेल नसेल. त्याऐवजी मॅक्सचं एक मॉडेल असेल. ते एंट्री-लेव्हल आयफोन मॉडेल असेल. त्यासह अन्य चार आयफोन मॉडेल्स असतील. त्यांना थोडं वेगळं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे.
यात iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max, iPhone 14 Pro Max यांचा समावेश असेल. यातल्या फीचर्समध्ये पंच होल डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. याशिवाय, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्रो ग्लास बॅकसह स्टेनलेस स्टील चॅसिससह येण्याची अपेक्षा आहे. फेस आयडी फिचर डिस्प्ले फीचरद्वारे लपवलं जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Apple दर वर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन आयफोन लाँच करते. ही परंपरा कायम ठेवत यंदाही 14 सप्टेंबर रोजी आयफोन 13 लाँच करण्यात आला. 24 सप्टेंबर रोजी आयफोन 13 जगभरातल्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी खुला करण्यात आला. पुढील वर्षीही कंपनी ही परंपरा कायम राखेल अशी अपेक्षा असून, एका खास प्रसंगी आयफोन 14 सीरिज दाखल केली जाईल, मात्र अद्याप तारखांची माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, प्रसिद्ध Apple टिपस्टर मिंग-ची कुओ यांनी असा दावा केला आहे, की iPhone 14, iPhone 14 Pro हे फोन्स 6.1-इंची OLED डिस्प्लेसह येतील, तर iPhone 14 Max, iPhone 14 Pro Max हे फोन्स 6.7-इंची OLED सह येतील. या चारही मॉडेल्समध्ये 5G कनेक्टिव्हिटी असेल. मिंग-ची कुओ हे TF इंटरनॅशनल सिक्युरिटीजचे विश्लेषक असून, भविष्यातल्या Apple उत्पादनांबद्दलचे त्यांचे अंदाज अचूक असतात.
आता 2022 मध्ये जेव्हा हा फोन प्रत्यक्षात दाखल होईल, तेव्हाच हे अंदाज खरे आहेत की नाहीत हे कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.