नवी दिल्ली, 15 जानेवारी : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेल्या सुमारे वर्षभराच्या काळात आपल्या सर्वांच्याच स्मार्टफोन वापरात (Use of Smartphone) मोठी वाढ झाली आहे. 'अॅप अॅनी' (App Annie) या संस्थेने या परिस्थितीचं विश्लेषण केलं असून, त्यातून समोर आलेले आकडे थक्क करणारे आणि भीतिदायकही आहेत.
2020 मध्ये सर्व प्रकारच्या अॅप स्टोअर्समधून (App Stores) झालेल्या जगातल्या एकूण अॅप डाउनलोड्सची (App Downloads) संख्या तब्बल 218 अब्ज एवढी होती. अॅप्स विकत घेण्यासाठी जगभरातल्या स्मार्टफोन युजर्सनी या काळात तब्बल 143 अब्ज डॉलर्स एवढी रक्कम खर्च केली. तसंच, दिवसातले सरासरी 4.2 तास एवढा कालावधी स्मार्टफोनवर घालवला.
अॅप डाउनलोड्सची 218 अब्ज ही संख्या त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक आहे. तसंच, नव्या अॅप्सची मागणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचंही या आकडेवारीतून दिसून आलं आहे.
अँड्रॉइड फोन्सवर जगभरातल्या युजर्सनी एकूण 3.5 ट्रिलियन तास म्हणजेच, साडेतीन लाख कोटी तास एवढा वेळ घालवला. त्यातला एकट्या भारतातल्या युजर्सचा वाटा 65 हजार 66 कोटी तास एवढा होता. भारतात केवळ अँड्रॉइड (Android) फोन्सवर युजर्सनी दर दिवशी सरासरी 4.6 तास एवढा कालावधी घालवला. 2019 मध्ये हा कालावधी प्रति दिन प्रति युजर सरासरी 3.3 तास एवढा होता. जगभरातल्या आणि भारतीयांच्याही मोबाईल वापरात किती मोठी वाढ वर्षभरात झाली आहे, याचा अंदाज या आकडेवारीवरून येतो.
भारतातल्या सर्व प्रकारच्या स्मार्टफोन युजर्सचा (अॅपल, अँड्रॉइड, इत्यादी) आर्थिक व्यवहारांशी संबंधित अॅप्सचा वापरही वाढला आहे. मोबाईल वॉलेट्स, डिजीटल पेमेंट अॅप्स, कार किंवा घर अशा मोठ्या खरेदीसाठीची अॅप्स, कर्ज किंवा गुंतवणूक करून देणाऱ्या सेवा आदींचा त्यात समावेश आहे.
या बाबतीत एशिया पॅसिफिक विभागात भारत आघाडीवर असून, त्यानंतर इंडोनेशिया आणि जपानचा नंबर लागतो. त्याच वेळी चीनमध्ये मात्र आर्थिक व्यवहारविषयक अॅप्सच्या (Financial Apps) वापरात घट दिसत आहे. पीअर टू पीअर लेंडिंग सर्व्हिसेससाठी नवे नियम लागू करण्यात आल्यानंतर तिथे ही घट दिसत आहे. 2020 मध्ये भारतात आर्थिक व्यवहारांशी संबंधित काइट झिरोधा, गुगल पे, फोन पे, एंजल ब्रोकिंग आणि मनीकंट्रोल या अॅप्सवर सर्वांत जास्त वेळ घालवला गेला.
सोशल मीडिया (Social Media) मध्ये, टिकटॉक (TikTok) हे जगभरातलं सर्वांत लोकप्रिय अॅप ठरलं. या अॅपच्या युजर्सच्या संख्येत त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 325 टक्क्यांनी वाढ झाली. या अॅपवर घालवलेल्या सरासरी मासिक कालावधीचा विचार करता चीन, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा, मेक्सिको, अमेरिका, जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशांत टिकटॉकने फेसबुकला मागे टाकलं. भारतात टेलिग्राम (Telegram), व्हॉट्सअॅप मेसेंजर, इन्स्टाग्राम, एमएक्स टकाटक आणि मोज या अॅप्सनी धुमाकूळ घातला. पण याच काळात, पबजी मोबाईल गेम आणि टिकटॉक यांसह अन्य काही चिनी अॅप्सवर भारतात बंदी घालण्यात आली.
सगळे जण लॉकडाउनमुळे घरात बंदिस्त असताना व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप्सनी मनोरंजनाची सोय केली. App Annie च्या माहितीनुसार, 2019 च्या तुलनेत, 2020 मध्ये 40 टक्के अधिक कालावधीचं स्ट्रीमिंग या अॅप्सद्वारे झालं. चीनमध्ये जवळपास 100 अब्ज तास एवढा कालावधी व्हिडीओ पाहिले गेले, तर भारतात व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप्सद्वारे 50 अब्ज तास व्हिडीओ पाहिले गेले.
नेटफ्लिक्स अनेक देशांत सर्वांत लोकप्रिय आहे. भारतात मात्र नेटफ्लिक्सला पहिली पसंती नाही. एमएक्स प्लेयर, त्यानंतर नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, एअरटेल एक्स्ट्रीम टीव्ही अॅप आणि वुई टीव्ही या अॅप्सना भारतीयांची पसंती होती. डिस्ने प्लस, हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी फाईव्ह यांचा समावेश भारतातल्या टॉप फाईव्ह स्ट्रीमिंग अॅप्समध्ये नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Technology