नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : उबेर Uber इंडियाने, रायडर मास्क व्हेरिफिकेशन सेल्फी (rider mask verification selfie) फीचर सुरू केलं आहे. ज्यांनी गेल्या काही दिवसांत उबेर कॅबमध्ये विना मास्क प्रवास केला आहे, त्या प्रवाशांसाठी हे फीचर सुरू करण्यात आलं असून त्यांना मास्क न घातल्यामुळे उबेरकडून टॅगही करण्यात आलं आहे. उबेर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आता या प्रवाशांना आपली पुढील राईड बुक करण्यावेळी मास्क घालून सेल्फी काढावा लागेल आणि तो उबेरकडे पाठवावा लागेल. उबेरने हे फीचर सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये लाँच केलं होतं. तेथे मिळालेल्या यशानंतर आता हे फीचर उबेरने भारतातही सुरू केलं आहे.
सुरक्षित प्रवासासाठी मास्क व्हेरिफिकेशन सेल्फी -
उबेर इंडियाचे अधिकारी पवन वैश्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रवासी विना मास्क उबेरमधून प्रवास करताना आढळले. अशाप्रकारे प्रवास करणं प्रवासी आणि कॅब ड्रायव्हर दोघांसाठीही नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे आधी विना मास्क प्रवास केलेल्या अनेक प्रवाशांना टॅग करण्यात आलं आहे.
ड्रायव्हरसाठी मास्क सेल्फी -
कोरोना काळात प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी उबेरने ड्रायव्हर्ससाठी मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. ड्रायव्हरला प्रवासापूर्वी मास्क घालून काढलेला स्वत:चा सेल्फी उबेर इंडियाकडे पाठवावा लागत होता. त्यानंतरच ड्रायव्हर्सला बुकिंग दिली जात होती. संपूर्ण भारतातून ड्रायव्हर्सचे 17.44 मिलियनहून अधिक सेल्फी आले असून हे आमच्या सुरक्षित प्रवासाबाबत दर्शवत असल्याचं उबेर इंडियाने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.