Home /News /technology /

तुमच्या मोबाइलमध्ये कसं येणार मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची काय आहे योजना?

तुमच्या मोबाइलमध्ये कसं येणार मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची काय आहे योजना?

हे कार्ड आतापर्यंत हार्ड कॉपी स्वरूपात दिलं जात होतं. पण डिजिटल भारत आणि सोयीस्करपणा या दोन्हींचा विचार करून हे कार्ड डिजिटल स्वरूपात मतदारांना उपलब्ध करून देण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. या योजनेला Elector’s Photo Identity Card (EPIC) एपीक असं नाव देण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 17 डिसेंबर : आपण भारतीय नागरिक असल्याची ओळख पटवण्यासाठी काय करतो? भारत सरकारने मान्यता दिलेली काही कागदपत्रं संबंधितांना दाखवतो. पासपोर्ट, रेशनकार्ड यांचा त्यात समावेश होतो. याचबरोबर एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे निवडणूक मतदान ओळखपत्र. हे ओळखपत्र आता डिजिटल स्वरूपात येण्याची शक्यता आहे. हे कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी जोडलेले असेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंबंधी विचारविनिमय सुरू केला असून, सर्व राज्यांचे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला, तर ही योजना प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जर निर्णय झाला, तर 2021 मध्ये होणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पदुच्चेरी, केरळ या राज्यंच्या विधानसभा निवडणुकीतही मतदारांना ही डिजिटल ओळखपत्र मिळू शकतात, असं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. निवडणूक ओळखपत्र (Elector’s Photo Identity Card - EPIC) काय असतं? भारताचा नागरिक कायदेशीरदृष्ट्या प्रौढ झाल्यावर मतदान करण्यास पात्र ठरतो म्हणजे मतदार होतो. त्याला मतदानाचा हक्क मिळतो. हा हक्क बजावताना त्याला ओळख पटवता यावी यासाठी निवडणूक आयोग (Election Commission of India) त्याची माहिती घेऊन त्याला एक कायमस्वरूपी ओळखपत्र देतो. हे कार्ड आतापर्यंत हार्ड कॉपी स्वरूपात दिलं जात होतं. पण डिजिटल भारत आणि सोयीस्करपणा या दोन्हींचा विचार करून हे कार्ड डिजिटल स्वरूपात मतदारांना उपलब्ध करून देण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. या योजनेला (Elector’s Photo Identity Card - EPIC) एपीक असं नाव देण्यात आलं आहे.

  (वाचा - PUBG Mobile येणार का? लाँचबाबत सरकारचा मोठा खुलासा)

  डिजिटल कार्डाचा फायदा काय? पहिला फायदा म्हणजे प्रवासाच्या तिकिटाप्रमाणे तुम्ही तुमचं एपीक तुमच्या मोबाइल फोनमध्ये डाउनलोड करू शकाल. त्यामुळे तुम्हाला त्याची प्रिंट सोबत बाळगावी लागणार नाही. दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाचा देशभरातील ओळखपत्रं छापण्याचा मोठा खर्च वाचेल. ती बचत झालेली रक्कम इतर कामांत वापरता येईल. त्याचबरोबर सध्याच्या कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असल्याने, तेही यामुळे पाळलं जाणार आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, हे ओळखपत्र पाठवण्यासाठी सरकार तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवून घेणार आहे. तो डेटा सरकारकडे तयार होईल. एपीक मिळवण्यासाठी काय करावं लागेल? नव्यानेच मतदार झाला असाल, तर जेव्हा तुम्ही निवडणूक आयोगाकडे तुमची नोंदणी करायला जाता तेव्हा तुम्हाला फोन नंबरही नोंदवावा लागेल. जेव्हा तुमचं नाव मतदार यादीत नोंदवलं जाईल, तेव्हा तुम्हाला मेसेज किंवा ई-मेलने माहिती दिली जाईल. या मेसेजनंतर ओटीपीच्या (One Time Password) मदतीने तुम्ही तुमचं ई-मतदान ओळखपत्र मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकाल आणि गरजेनुसार वापरू शकाल. ज्यांचं नाव आधीपासून यादीत आहे, त्यांना त्यांची कागदपत्रं देऊन मोबाईल क्रमांक पुन्हा नोंदवावा लागेल. ही बँकेच्या केवायसीसारखी प्रक्रिया असेल.

  (वाचा - वाहनांवरील Number Plate बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज)

  एपीकची काय असतील वैशिष्ट्य? हे ई-ओळखपत्र दिसायला सध्याच्या छापील मतदान ओळखपत्रासारखंच असेल, फक्त ते पीडीएफ स्वरूपात मोबाइलमध्ये डाउनलोड करता येईल. यामध्ये तुमची माहिती असलेला क्यूआर कोड असेल की नाही याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण त्याचाही उपयोग यात केला जाऊ शकतो. या क्युआर कोडमध्ये तुमचं नाव, जन्मतारीख ही माहिती असेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या