नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गातून बाहेर पडण्यासाठी सगळं जग प्रयत्न करत आहे. यावर लसीकरण (Vaccination) हाच यावर सर्वोत्तम उपाय असल्याने सर्व देशांमध्ये लसीकरण मोहीम वेगानं राबवण्यात येत आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल, तितका या विषाणूचा (Covid-19) धोका कमी होऊ शकतो आणि संसर्ग रोखण्यासाठी लादण्यात येणारे लॉकडाउनसारखे निर्बंध हटवणं शक्य होईल. मात्र यासाठी सर्वांचं लसीकरण होणं महत्त्वाचं आहे. कोरोनाची विनाशकारी दुसरी लाट नुकतीच ओसरली आहे, तोपर्यंतच तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेत स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल, तर लसीकरण करून घेणं अत्यावश्यक आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना या विषाणूची लागण झाली, तरी त्याची तीव्रता कमी असते आणि हॉस्पिटलायझेशनची गरज आणखी कमी होते. त्यामुळे प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घेणं महत्त्वाचं आहे.
लसीकरणासाठी सर्वत्र सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, सरकारकडून मोफत लस दिली जात आहे. लसीचे डोस दिल्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र (Certificate) दिलं जातं. येत्या काही दिवसांमध्ये हे प्रमाणपत्र आपल्या आधार कार्डाइतकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुमचं लसीकरण झालं असेल, तर त्याचं प्रमाणपत्र अवश्य डाउनलोड करून ठेवा. तुम्ही अद्याप हे काम केलेलं नसेल तर WhatsApp च्या मदतीने अगदी सहजपणे हे काम करू शकता. त्याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे.
सरकारने MyGov Corona HelpDesk व्हॉट्सअॅप चॅटबॉट (WhatsApp Chat boat) दाखल केलं होतं. या चॅटबॉटचा वापर करून तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
- MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअॅप क्रमांक +91 9013151515 आहे. तुम्हाला हा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा लागेल.
- आता व्हॉट्सअॅप ओपन करा आणि सर्च बारमध्ये हा MyGov नंबर शोधा.
- हा नंबर मिळाल्यावर चॅट बॉक्स किंवा विंडोवर जावं लागेल.
- आता चॅट बॉक्समध्ये डाउनलोड सर्टिफिकेट (Download Certificate) असं टाईप करा.
- यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपवरून एक 6 अंकी ओटीपी येईल.
- या चॅट बॉक्समध्ये हा OTP टाकावा लागेल. त्या नंबरवर जितक्या व्यक्तींची लसीकरण नोंदणी झाली असेल आणि त्यांना लस मिळाली असेल त्यांची यादी व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली जाईल. त्यातून ज्या व्यक्तीचं सर्टिफिकेट हवं आहे, त्याचा नंबर टाईप करावा लागेल.
- आता Covid-19 Vaccine Certificate दिसेल. तुम्ही ते सहज डाउनलोड करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.