नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई (Mumbai) 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाने (Samruddhi Expressway) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडली जात आहे. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक असणार आहे. तो बनवण्यासाठी सुमारे 5 हजार 500 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या महामार्गावर ताशी 150 किमी वेगाने वाहने चालवता येतील. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या प्रवासासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागणार आहे
पण या समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी टोल टॅक्स (Toll tax) भरावा लागणार आहे. जाणून घ्या, या महामार्गावरून नागपूर ते मुंबई किंवा मुंबई ते नागपूर असा प्रवास करताना किती टोल टॅक्स भरावा लागेल
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड म्हणाले की, ‘एलडब्यूव्ही (लाइट वेट वाहन) आणि कारला नागपूर ते मुंबई किंवा मुंबई ते नागपूर प्रवास करताना एका बाजूचा टोल टॅक्स म्हणून 1100 रुपये द्यावे लागतील. केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, या महामार्गावर एलडब्ल्यूव्हीवर (LWV) 1.65 रुपये प्रति किलोमीटर दराने टोल टॅक्स आकारला जात आहे. याशिवाय, जड वाहनांना हलक्या वाहनांपेक्षा तीनपट जास्त टोल भरावा लागेल.’
समृद्धी महामार्ग केव्हा होणार तयार?
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकल्पासाठी सुधारित मुदत जाहीर केली आहे. ज्यामध्ये नागपूर आणि शिर्डी दरम्यानचे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. याशिवाय शिर्डी ते ठाणे हे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोना महामारीमुळे विलंब झाला आहे. हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
नागपूर- मुंबई प्रवासाचा वेळ होणार कमी -
‘सध्या नागपूर ते मुंबई हा बाय रोड प्रवास करताना 15 तास लागतात,’ अशी माहिती देतानाच एकनाथ शिंदे म्हणाले, ‘समृद्धी महामार्गाच्या निर्मितीनंतर या प्रवासासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागेल. ते पुढे म्हणाले, ‘महामार्गाच्या बाजूने 250 मेगावॅटचा सोलर प्लांट (solar plant) उभारण्याची सरकारची योजना आहे. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.