नवी दिल्ली, 15 जून : स्मार्टफोन (Smartphone) असो की कम्प्युटर, सर्वच युजर्ससाठी गुगल (Google) हे अत्यंत महत्वाचं टूल ठरलं आहे. जीमेलसह अन्य सुविधा तसंच विविध फीचर्स गुगलकडून सातत्याने युजरसाठी दिली जात आहेत. त्यात आता एका नव्या फीचरचा समावेश होत आहे. हे फीचर प्रामुख्याने गुगल फोटोजसाठी (Google Photos) असेल. या फीचरचा वापर करुन युजरला आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ लपवता म्हणजेच हाइड (Hide) करता येणार आहेत.
टेक्नोलॉजी कंपनी गुगलने मागील महिन्यात झालेल्या Google I/O मध्ये गुगल फोटोजबाबत एका नव्या सुविधेची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनीने गुगल फोटोजसाठी लॉक्ड फोल्डर फीचर (Locked Folder Feature) सुविधा सुरू केली आहे. यामुळे युजर पासकोड (Passcode) किंवा फिंगर प्रिंटसच्या (Finger Prints) माध्यमातून एका सुरक्षित फोल्डरमध्ये वैयक्तिक फोटोज, व्हिडीओ हाईड म्हणजेच लपवून ठेवू शकतो.
या लॉक केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले फोटो किंवा व्हिडीओ फोटो ग्रीड, सर्च, अल्बम किंवा मेमरीमध्ये दिसू शकणार नाहीत. तसंच थर्ड पार्टी अॅप्सच्या माध्यमातून देखील असे फोटो किंवा व्हिडीओ दिसू शकणार नाहीत. हाइड केलेल्या फोटोंचा क्लाऊडवर (Cloud) बॅकअप घेता येणार नाही. जर कोणत्याही फोटो किंवा व्हिडीओचा तुम्ही यापूर्वी बॅकअप घेतला असला, तर गुगल तो हटवणार असून, हे फोटो आणि व्हिडीओ लोकल फोल्डरमध्येच राहणार आहेत.
असा करा वापर -
युजरला हे फीचर वापरायचं असेल, तर लायब्ररी>युटिलिटीज>लॉक्ड फोल्डरमध्ये जाऊन या नव्या लॉक्ड फोल्डरचा वापर सुरू करू शकता. एकदा याची सेटिंग केल्यानंतर युजर आपले फोटो आणि व्हिडीओ या लायब्ररीला जोडू शकतील.
गुगल कॅमेरा अॅप देखील सेट करु शकता -
युजरला आपले नवे फोटो किंवा व्हिडीओ थेट या लॉक्ड फोल्डरमध्ये सेव्ह करायचे असतील, तर गुगल कॅमेरा अॅपचं (Google Camera App) सेटिंग करावं लागेल. या सुविधेचा वापर करण्यासाठी युजरला कॅमेरा अॅप सुरू करावं लागेल. यासाठी वरील बाजूच्या डाव्या कोपऱ्यातील आयकॉनवर टॅप करावं लागेल आणि लिस्टमधलं लॉक्ड फोल्डर सुरू करावं लागेल.
गुगल पिक्सेल (Google Pixel) -
ही सुविधा सध्या केवळ गुगल पिक्सेल स्मार्टफोनवरच सुरू करण्यात आली आहे. यात Google Pixel 3 सीरीज, Pixel 4 आणि Pixel 5 सीरीजचा समावेश आहे. सध्या हे फीचर पिक्सेल स्मार्टफोनसाठी एक्सक्लुसिव्ह ठरत आहे. लवकरच लॉक्ड फोल्डर हे फीचर अँड्रॉईड फोन्ससाठी सुरू केलं जाईल आणि या वर्षी सर्व युजर्स या फीचरचा वापर करू शकतील, असं कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.