नवी दिल्ली, 22 जून : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. केवळ कॉल करणं एवढ्यापुरताच स्मार्टफोन मर्यादित नसून, मनोरंजनासह अनेक प्रकारची कामंही त्याद्वारे करता येतात. OTT प्लॅटफॉर्म्स आल्यामुळे लोक कार्यक्रम, लाइव्ह गेम्स, सिनेमे पाहणं किंवा गाणी ऐकणं यांसाठी स्मार्टफोनचा वापर करतात. त्यामुळे स्मार्टफोनसोबत हेडफोन्स (Headphones) वापरणं हे ओघाने आलंच. काही वेळा हेडफोनचा जॅक (Headphone Jack) बिघडला, तर मनस्ताप होतो. सर्व्हिस सेंटरला गेलं, तर छोट्याशा कामासाठी 200-500 रुपये मोजावे लागतात, पण त्याशिवाय पर्यायही नसतो. परंतु, हेडफोनचा जॅक काम करत नाही असं वाटलं, तर तुम्ही या काही ट्रिक्स वापरुन पाहू शकता. कदाचित तुमचं काम घरबसल्या होऊ शकेल.
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी (Bluetooth Connectivity) -
अनेकदा असं होतं, की फोन ब्लूटूथद्वारे अन्य एखाद्या डिव्हाईसला कनेक्ट झालेला असतो. हे लक्षात न आल्यामुळे तुम्ही हैराण झालेले असता, की आवाज का येत नाही. त्यामुळे आवाज येत नसेल तर एकदा ब्लूटूथ कुठे कनेक्ट झालं नाहीये ना ते पाहावं. तसं कनेक्ट झालेलं असेल, तर ते डिसकनेक्ट करावं आणि मग हेडफोन्सद्वारे येऊ शकेल. अलीकडे अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे मल्टी डिव्हाईस ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सपोर्ट करणारे स्मार्टफोन्सही मार्केटमध्ये आले आहेत. तुमच्या स्मार्टफोनला ती सुविधा आहे की नाही, हे पाहावं लागेल.
अस्वच्छता -
स्मार्टफोन आपण नियमितपणे वापरतो, मात्र त्याची स्वच्छता नियमितपणे केली जातेच असं नाही. त्यामुळे स्मार्टफोन जॅकमध्ये धूळ, कचरा साठून राहू शकतो. तसं झालं तर हेडफोन नीट काम करत नाही. म्हणून ठरावीक दिवसांनी हेडफोन जॅकमध्ये कापूस किंवा कॉटन बड (Cotton Bud) फिरवून तो स्वच्छ करावा. अर्थात, त्यात कोणत्याही प्रकारचं लिक्विड वापरू नये, लिक्विडमुळे जॅक खराब होऊ शकतो.
ओलावा -
आता नवे बहुतांश स्मार्टफोन्स वॉटर रेझिस्टंट असतात. तरीही ते पाण्यापासून, ओलाव्यापासून दूर ठेवणंच फायद्याचं. अनेकदा पावसातल्या ओलाव्यामुळे किंवा ओल्या हातांनी फोन उचलल्यामुळे हेडफोन जॅक योग्य तऱ्हेने काम करत नाही. तसं असेल, तर तो ओलावा कमी करायला हवा. त्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करता येऊ शकेल. मीडियम मोडचाच वापर करणं गरजेचं आहे. कारण हेयर ड्रायरमधून (Hair Dryer) जास्त उष्णता बाहेर पडली, तर स्मार्टफोन त्या उष्णतेमुळे खराब होऊ शकतो.
सेटिंग्ज (Settings) -
अनेकदा घरातली लहान मुलं स्मार्टफोन हाताळतात. तेव्हा नकळतपणे सेटिंग्जमध्ये काही बदल केले जातात. त्यामुळे हेडफोन फंक्शनॅलिटीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अचानक हेडफोन्समधून आवाज येणं बंद झालं असेल, तर सेटिंग्ज एकदा चेक करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news