नवी दिल्ली, 21 डिसेंबर : सध्या डिजिटल युगात आणि स्मार्टफोन जवळ असताना फोटो काढणं अतिशय सोपं झालं आहे. कोणीही, कितीही फोटो काढू शकतो. अनेकदा सहलींना जातो आणि त्या ठिकाणी फोटो क्लिक करतो. काही वर्षांनी हा फोटो कुठं काढला होता हे विसरतो. पण आता हे आठवत बसायची गरज नाही, कारण गुगलनेच गुगल फोटोजमध्ये (Google Photos) ही सुविधा देणार असल्याचं जाहीर केलंय.
आपल्या स्मार्टफोनमधलं लोकेशन हा पर्याय सुरू ठेवला, तर आपण दिवसभर कुठे गेलो, किती वाजता गेलो ही सगळी माहिती गुगल मॅप्सवर (Google Maps) दिसते. बहुतांश लोक या फीचरचा वापर करत नाहीत, पण जेव्हा आपण या वेळी कुठं होतो हे शोधायची वेळ येते तेव्हा मात्र ते ही सुविधा वापरतात. गुगल फोटोजच्या 5.23.0 या व्हर्जनपासून गुगल फोटोजमध्येही गुगल मॅप्ससारखी लोकेशन सांगण्याची सुविधा कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच गुगलने गुगल फोटोजमध्ये सिनेमा हे नवं फीचर आणणार असल्याचं जाहीर केलं होतं.
युजर्स आता जेव्हा गुगल फोटोज अॅपमध्ये जातील, तेव्हा त्यांना फोटो स्वरूपातील त्यांची मॅप टाइमलाइन पाहता येईल. हे फीचर वापरण्यासाठी ग्राहकांना गुगल फोटोजमध्ये जावं लागेल. त्यानंतर सर्चमध्ये जावं लागेल. तिथं माहिती देणारा वॉर्निंग पॉप-अप मेसेज दिसेल. त्यात लिहिलं असेल की, मॅप्स टाइमलाइन तुमच्या मॅप्समध्ये अॅड केलेली आहे. त्याचबरोबर या फीचरची माहिती देणारी लिंकही, याच पॉप-अप मेसेजमध्ये असेल.
‘मॅप्स टाइमलाइन (Maps timeline) दाखवण्यासाठी गुगल फोटोज तुमच्या कॅमेराचं GPS आणि गुगल लोकेशन हिस्ट्री तसंच नोंदवलेलं लँडमार्क्स यांचा वापर करेल. तुम्ही गुगल फोटोजचा वापर करून तुमचे फोटो कोणत्या ठिकाणी काढले आहेत, या माहितीच्या आधारे ते ऑर्गनाइज, सर्च किंवा पाहू शकेल,’ असं या मेसेजमध्ये लिहिलं असेल.
गुगलने आपल्या सपोर्ट पेजवर ही माहिती दिली आहे. ज्यांना एखादा फोटो नेमका कुठं काढला हे शोधायचं असेल, त्यांच्यासाठी या फीचरचा उपयोग होईल. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांना त्यांचा स्मार्टफोन वापरून (फोनमधील लोकेशन फीचर सुरू ठेवून) काढलेल्या फोटोंचीच टाइमलाइन या अॅपमध्ये दिसणार आहे. याचा अर्थ असा की एरव्ही गुगल मॅप्समध्ये आपण जिथे जातो ती प्रत्येक हालचाल नोंदवली जाते, तसं इथं होणार नाही. ज्या क्षणी तुम्ही फोटो काढला असेल तोच क्षण गुगल फोटोजच्या मॅप्स टाइमलाइनमध्ये (Google Photos Maps timeline) दिसेल.
अँड्रॉइड आणि iOS दोन्ही मधील गुगल अॅप्सवर हे फीचर उपलब्ध आहे. प्रायव्हेट टाइमलाइन व्ह्यू बंद करण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे. गुगल मॅप्सवर ट्रिप्स (Google Maps Trips tab) हे टॅब नव्याने अॅड केलं आहे. त्यामुळे कोविड-19 पूर्वी झालेल्या ट्रिप्समधील फोटोंचा आनंद युजर्स पुन्हा अनुभवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google