नवी दिल्ली, 22 मार्च : देशात कोरोना लसीकरणाचा (Covid-19 Vaccination) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. याच लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर उबरने (Uber) फ्री राईड देण्याची घोषणा केली आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था रॉबिन हुड आर्मी (Robin Hood Army) उबरची साथ देणार असल्याची माहिती आहे. उबरने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 53 शहरांमध्ये या सेवेचा लाभ घेता येणार आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांकडून उबर कोणतेही पैसे घेणार नसून, अशा लोकांना फ्री राईड देण्यात येणार आहे.
या लोकांना मिळणार फ्री राईडचा फायदा -
उबरच्या या सेवेचा फायदा वयोवृद्ध आणि दुर्बल वर्गाला होणार आहे. उबर इंडियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंह यांनी सांगितलं की, या कठिण काळात दुर्बल समुदायाच्या लसीकरणाला समर्थन देण्यासाठी, आमचे भागीदार रॉबिन हुड आर्मीसह सामिल झाल्याचा आनंद आहे. यामुळे दुर्बल घटकांना या महामारीतून सावरण्यासाठी मदत होईल, तसंच देशाच्या आर्थिक सुधारणेत मदत होईल. तसंच येणाऱ्या आठवड्यांमध्ये, महिन्यांमध्ये उबर दुर्बल-कमजोर समुदायांसाठीच्या लसीकरण मोहिमेत पाठिंबा देण्यास वचनबद्ध आहे.
कसा मिळेल फ्री राईडचा फायदा -
वॅक्सिनेशनसाठी 50 रुपयांपर्यंत फ्री राईडसाठी उबरसह रॉबिन हुडही सहकार्य करणार आहे. ज्यात वृद्धाश्रमातील वृद्ध, इतर गरीब आणि वयोवृद्ध लोकांना कोविड अॅपवर आपलं रजिस्ट्रेशन करुन या राईडचा फायदा घेता येणार आहे.
उबरने वॅक्सिनेशनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वास्थ्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) राज्य सरकार आणि NGO साठी 10 कोटी रुपयांच्या फ्री राईडची घोषणा केली आहे. ज्यात वृद्ध लोकांसाठी 50 लाख रुपयांची फ्री राईड हा एक भाग आहे.
उबर आणि रॉबिन हुड आर्मीने गरीबांसाठी केली होती जेवणाची सोय -
2020 मध्ये कोरोना काळात उबर आणि रॉबिन हुड आर्मीने देशभरात गरजू-गरीबांसाठी, भुकलेल्यांसाठी जेवण पोहचवण्याचंही काम केलं होतं. त्यांच्या या कामाचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. अशात आता कोरोनासाठीच्या लसीकरण मोहिमेतही उबर फ्री राईडच्या माध्यमातून लोकांसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus