29 जून: सोशल नेटवर्किंगमध्ये मास मीडिया म्हणून गणल्या गेलेल्या फेसबूकच्या युजर्सची संख्या तब्बल 200 कोटींवर पोचली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी ही संख्या मानली जातेय.
फेसबुकचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनीच फेसबुकवरून ही माहिती दिलीय. 'मंगळवारी सकाळपर्यंत फेसबुक समुदाय हा आता अधिकृतपणे 200 कोटी लोकांचा झाला आहे. जगाला जोडण्यात आम्ही प्रगती पथावर आहोत,'असेही त्यांनी सांगितले. याच निमित्ताने फेसबुकने मंगळवारी प्रत्येक युजर्सचे पर्सनल व्हिडिओही शेअर केलेत.
फेसबुक युजर्सची संख्या 100 कोटींवरून 200 कोटींवर पोहोचण्यास 5 वर्षे लागलीत. ऑक्टोबर 2012 मध्ये फेसबुकने 100 कोटी युजर्सचा टप्पा गाठला होता, तीच संख्या अवघ्या पाच वर्षांमध्ये दुप्पट म्हणजेच 200 कोटी बनलीय. या कामगिरीबद्दल मार्क झुकेनबर्गने फेसबूकच्या टीमचं अभिनंदनही केलंय. 'आम्हाला जगातील प्रत्येकाला जोडण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु, लोकांना केवळ एकमेकांशी जोडण्याव्यतिरिक्त खूप काही करायला हवं. आपण त्यांना एकमेकांच्या जवळ आणायला हवं. ' असंही झुकेरबर्ग यांनी म्हटलं आहे.
इंटरनेट जगतातील दिग्गज फेसबुकच्या या प्रगतीमध्ये अनेक छोट्या छोट्या कम्युनिटींनी हातभार लावल्याचंही फेसबुकचे उपाध्यक्ष नाओमी ग्लीट यांनी म्हटलंय.