तेल अवीव, 28 नोव्हेंबर : खोटं बोलू नको, तुझ्या चेहऱ्यावर तू खोटं बोलतो आहेस हे स्पष्ट दिसतं आहे. खोटं बोलताना एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात आणि मग ते खोटं बोलत आहे हे समजतं. पण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे शक्य नसतं. काही व्यक्ती खोटं लपवण्यात तरबेज असतात. अशा व्यक्ती खोटं बोलत असतील तर त्यांचं खोटं पकडणं सोपं नसतं. एखाद्या गुन्हेगाराकडून गुन्ह्यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांना अनेक मार्गांचा वापर करावा लागतो. पण आता प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरूनच खोटेपणा उघड होणार आहे.
एखादी व्यक्ती खोटं बोलत आहे, हे सिद्ध करण्यासाठीदेखील वैज्ञानिकदृष्ट्या कमी पर्याय उपलब्ध आहेत. तथापि, आता इस्रायलमधल्या (Israel) शास्त्रज्ञांनी असं तंत्रज्ञान शोधून काढलं आहे, की ज्यामुळे खोटं ओळखणं (Lie Detector Technology) पूर्वीपेक्षा अधिक सोपं होणार आहे. हे तंत्रज्ञान (Technology) वापरण्यास अगदी सोपं आहे. समोरची व्यक्ती खरं बोलतेय की खोटं, हे केवळ चेहऱ्याच्या हालचालींवरून कळू शकणार आहे.
तेल अवीव युनिव्हर्सिटीतले (Tel Aviv University) प्रोफेसर डिना लेवी आणि त्यांच्या टीमने एक असं तंत्र शोधून काढलं आहे, की ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचं खोटं पकडणं सहज शक्य होणार आहे. या तंत्राच्या मदतीनं चेहऱ्यावरच्या हालचालींच्या आधारे खोटं बोलणाऱ्यांचा पर्दाफाश होईल आणि समोरची व्यक्ती खरं बोलतेय की खोटं, हेदेखील कळेल. प्रोफेसर याएल हानिन यांनी बनवलेल्या या उपकरणाची विक्री एक्स ट्रोडस (Ex-Trodes) ही इस्रायली कंपनी करत आहे.
हे वाचा - जगातला पहिला व्यक्ती ज्याने 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानातून हुबेहूब नवा डोळा मिळवला
या तंत्रज्ञानात काही अतिशय मऊ पृष्ठभागांवर स्टिकर्स तयार करण्यात येतील आणि त्यामध्ये इलेक्ट्रोड जोडले जातील. हे स्टिकर्स चेहऱ्यावर चिकटवले जातील. हे सेन्सर्स स्नायू आणि मज्जातंतूंवर लक्ष ठेवतील. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, खोटं बोलत असताना व्यक्तीचे गाल आणि भुवया वेगळ्या प्रकारे हालचाल करतात. हे तंत्रज्ञान ज्या पद्धतीनं काम करतं, तसं याआधी कोणतंही उपकरण करू शकलं नाही. या पद्धतीचा वापर करून 73 टक्के प्रकरणांमध्ये खरं आणि खोटं अचूकपणे शोधता आलं आहे.
हे वाचा - मधुमेहासारख्या आजारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी सांगितलं सिक्रेट
हे उपकरण एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चिकटवल्यानंतर ती व्यक्ती कुठे खोटं बोलत आहे, हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी हेडफोन लावून त्या व्यक्तीचे शब्द ऐकले. उपकरण 73 टक्के यशस्वी ठरल्यानंतर आता संशोधक हाय रिझोल्युशन कॅमेराच्या फूटेजच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या स्नायूंच्या हालचालींवरून त्याचं खोटं बोलणं ओळखता यावं यासाठी विशेष काम करत आहेत. पोलीस चौकशीसाठी (Police Enquiry) हे उपकरण उपयुक्त ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Technology